रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना टफ फाईट दिली. एकीकडे भारताचे अन्य फलंदाज अपयशी ठरत असताना रोहितने कॅप्टन्स इनिंग्ज खेळली. त्याने शतक झळकावताना भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली अन् अनेक विक्रमही मोडले.
रवींद्र जडेजाच्या पाच आणि आर अश्विनच्या तीन विकेट्सच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल ( २०) यांनी ७६ धावांची भागीदारी केली. नाईट वॉचमन म्हणून आलेला अश्विन ( २३) रोहितसह १०४ चेंडूंत ४२ धावांची भागीदारी करून माघारी परतला.
चेतेश्वर पुजारा आज आक्रमक पवित्र्यात दिसला. पण, मर्फीच्या चुकीच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो ७ धावांवर बाद झाला. लंच ब्रेकनंतरच्या पहिल्याच चेंडूवर मर्फीने भारताला धक्का दिला. विराटला ( १२) त्याने बाद केले. नेथन लॉयनने नव्या स्पेलमधील पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवचा ( ८) त्रिफळा उडवला. सूर्यानेही या चेंडूचे कौतुक केले. Ind vs aus scorecard, Ind vs aus live match
चौकार खेचून रोहितने शतक पूर्ण केले. १७१ चेंडूंत त्याने हे शतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून त्याचे हे पहिले कसोटी शतक ठरले. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत शतक झळकावणारा रोहित भारताचा सातवा कर्णधार आहे. यापूर्वी विराट कोहली ( ४), सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी व अजिंक्य रहाणे ( प्रत्येकी १) यांनी शतक झळकावले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वगळता विजय हजारे, मन्सुर अली खान पतौडी, सुनील गावस्कर, कपिल देव व दीलिप वेंगसरकर यांनीही कर्णधार म्हणून कसोटीत शतक झळकावली आहेत. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीवीर म्हणून सर्वाधिक ९ शतकांच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली.
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारे कर्णधारांमध्ये तिलकरत्ने दिलशान ( श्रीलंका), फॅफ ड्यू प्लेसिस ( दक्षिण आफ्रिका), हिदर नाईट ( इंग्लंड), बाबर आजम ( पाकिस्तान) व रोहित शर्मा ( भारत) ही नावं आहेत आणि या लिस्टमध्ये एकमेव महिला क्रिकेटपटू हिदर नाईट आहे.