Join us  

India Tour to South Africa : रोहित शर्मा, रिषभ पंतचे पुनरागमन होणार; जाणून घ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणारी टीम इंडिया कशी असणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 11:09 AM

Open in App
1 / 8

Team India's probable squad for South Africa Tests : क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं ( CSA) सोमवारी भारताविरुद्धच्या मालिकेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार भारतीय संघ तीन कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार असून २६ डिसेंबरपासून दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

2 / 8

आधीच्या वेळापत्रकानुसार हा दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार होता, परंतु बीसीसीआयनं ओमायक्रॉनच्या संकटामुळे या दौऱ्यातील चार ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका स्थगित केली. या दौऱ्यासाठी बीसीसीआय १८ सदस्यीय संघ आज जाहीर करणार आहेत आणि त्यात काही टफ कॉल घेतले जाण्याची शक्यता आहे.

3 / 8

सलामीवीर - रोहित शर्मा व लोकेश राहुल यांच्या पुनरागमनानं टीम इंडियाचा प्रश्न सुटला आहे. पण, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरीनंतर मयांक अग्रवालकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शुबमन गिलच्या जागी रोहितची एन्ट्री होईल. त्यामुळे जर राहुल तंदुरुस्त नसल्यास मयांकला प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकते.

4 / 8

मधली फळी - मधल्या फळीत निवड समितीची खरी डोकेदुखी ठरणार आहे. विराट कोहलीसह चेतेश्वर पुजाराचं संघातील स्थान कायम आहे. अजिंक्य रहाणेवरून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. हनुमा विहारीला त्याच्याजागी संधी मिळू शकते. भारत अ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर विहारीनं चांगली खेळी करून दाखवली आहे. श्रेयस अय्यरचंही नाव चर्चेत आहे, कारण त्यानं पदार्पणात चांगली कामगिरी केली आहे.

5 / 8

अष्टपैलू खेळाडू - आर अश्विन व रवींद्र जडेजा या जोडीचे संघातील स्थान कायम आहे. अक्षर पटेलला वन डे संघात स्थान मिळू शकते, परंतु त्यासाठी शार्दूल ठाकूरला बाहेर बसावे लागेल. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टी पाहता दोन फिरकीपटू खेळवण्यात काहीच अर्थन नाही. त्यामुळे कसोटी संघात अक्षरचा विचार होण्याची शक्यता कमी आहे.

6 / 8

यष्टिरक्षक - कानपूर कसोटीत वृद्धीमान सहानं मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी करून निवड समितीला त्याचा विचार करण्यास भाग पाडले आहे. रिषभ पंतचे संघात कमबॅक होणार आहे. त्यामुळे सहाचा राखीव यष्टिरक्षक म्हणून समावेश केला जाऊ शकतो.

7 / 8

जलदगती गोलंदाज - जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांचे संघात पुनरागमन होणार आहे. मोहम्मद सिराज व उमेश यादव यांचेही संघातील स्थान कायम आहे. एका जागेसाठी युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा व अनुभवी इशांत शर्मा यांच्यात चुरस होईल. इशांतची कामगिरीही समाधानकारक झालेली नाही. पण, त्याच्याकडील १०५ कसोटी सामन्यांचा अनुभव दुर्लक्षित करून चालणार नाही.

8 / 8

भारतीय संघाचे संभाव्य १८ शिलेदार - विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे/हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा/ इशांत शर्मा

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीरोहित शर्मारिषभ पंत
Open in App