India Tour of England : टीम इंडियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे आणि यजमान इंग्लंडनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठीचा 17 सदस्यीय संघ बुधवारी जाहीर केला.
बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो आणि सॅम कुरन यांचे संघात पुनरागमन झाले आहे, तर ऑली रॉबिन्सन यालाही पुन्हा बोलवण्यात आले आहे. जोफ्रा आर्चर व ख्रिस वोक्स हे अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेले नाहीत आणि त्यामुळे पहिल्या दोन कसोटींसाठी त्यांच्या नावाचा विचार केला गेला नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात रॉबिन्सननं सात विकेट्स घेतल्या होत्या, परंतु त्याच्या जुन्या ट्विटमुळे आयसीसीनं त्याच्यावर बंदीची कारवाई केली होती. तपासाअंती त्याची शिक्षा कमी झाली अन् तो भारताविरुद्ध खेळणार आहे. पण, रॉबिन्सनव्यतिरिक्त आणखी एका नावाची चर्चा सुरू झाली आहे आणि ते नाव म्हणजे हसीब हमीद ( Haseeb Hameed)... सध्या तो टीम इंडियाविरुद्धच्या कौंटी एकादश संघाकडून दमदार खेळ करत आहे.
2016साली भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाकडून 19 वर्षीय हसीब हमीदनं पदार्पण केलं होतं. इंग्लंडकडून सर्वात कमी वयात पदार्पण करणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. अँड्य्रू स्ट्रॉस याच्या निवृत्तीनंतर अॅलेस्टर कूकसोबत हमीदला सलामीला खेळण्याची संधी मिळाली अन् त्यानं पहिल्या कसोटीत 31 व 82 अशा धावा केल्या.
त्याच्या पहिल्या कसोटी अर्धशतकानं वडील इस्मैल यांना अश्रू अनावर झाले होते. लँकशायर येथे हमीदचा जन्म झाला असला तरी त्याच्या कुटुंबीयांचे मुळ हे गुजरात आहे. त्यानं भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांत 43.80च्या सरासरीनं 2 अर्धशतकांसह 219 धावा केल्या होत्या.
त्यानंतर त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले. पण, त्यानं यंदाच्या कौंटी क्रिकेटमध्ये 9 सामन्यांत 45.85च्या सरासरीनं 642 धावा केल्या आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली होती. आता तो पुन्हा भारताविरुद्ध दमदार कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. 2016च्या कौंटी स्पर्धेत लँकशायरकडून 1000 धावा करणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला होता.
इंग्लंडचा संघ ( England Men’s Test Squad) - जो रूट ( कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॅवली, सॅम कुरन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, मार्क वूड