भारत वनडेत पुन्हा अव्वल;नागपुरात कांगारुंना चारली धूळ

नागपूरमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखून पराभव केला आणि पुन्हा वनडेत अव्वल स्थानावर कब्जा केला.

वनडे मालिकेतील ५ व्या आणि अंतिम वनडे सामन्यात रोहित शर्माच्या (१२५) धडाकेबाज शतकाच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखून पराभव केला.

ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २४३ धावांचे आव्हान उभे केले होते. भारताने मात्र ४३ चेंडू शिल्लक ठेवत हे लक्ष्य पार केले.

या विजयाबरोबरच टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, निर्धारित ५० षटकांमध्ये ९ विकेट गमावत ऑस्ट्रेलियाला केवळ २४२ धावाच जमवता आल्या.

ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर अक्षर पटेलने ३ गडी टिपले. मालिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

रोहित शर्माच्या दमदार खेळीमुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

तिसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया वनडे रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर होती. परंतु बेंगळुरूतील चौथा वनडे गमावल्यानंतर भारतीय संघ एक पायरी खाली सरकला होता.