India vs Pakistan, Ramiz Raja: "भारताला पाकिस्तानवर दादागिरी करायचा अजिबात अधिकार नाही, त्यापेक्षा..."

रमीझ राजाचं पद गेलं तरी अजूनही BCCI वर टीका सुरूच आहे

India vs Pakistan, Ramiz Raja: माजी क्रिकेटपटू रमीझ राजाला काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. रमीझ राजाच्या जागी नजम सेठी नवे अध्यक्ष झाले. PCBने अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर रमीझ राजा यांनी अनेक विषयांवर मौन सोडले.

भारतात होणाऱ्या आगामी वन डे क्रिकेट विश्वचषकाच्या आयोजनाबाबत PCBचे मावळते अध्यक्ष रमीझ राजाने काही दिवसांपूर्वी भारताला डिवचण्यासाठी एक विधान केले होते. पाकिस्तानचा संघ भारतात विश्वचषक खेळण्यासाठी आलाच नाही तर तुमचा खेळ कोण बघणार, अशा आशयाचे ते विधान होते. यावरून अनेक वादविवाद निर्माण झाले.

अलीकडेच इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत पाकिस्तानचा मायदेशात दारूण पराभव झाला. पाकिस्तानला ०-३ने कसोटी मालिका गमवावी लागली. घरच्या मालिकेत झालेल्या पराभवानंतर तसेच विविध बेजबाबदार विधानांमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रमीझ राजाची पीसीबी अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. तरीही रमीझ राजा यांनी पुन्हा BCCIवर निशाणा साधला आहे.

"BCCIने जर सांगितले असते की भारत आशिया कप २०२३ मध्ये आम्ही सहभागी होऊ शकत नाही, कारण त्यांना पाकिस्तान येण्यास अडचण आहे.. तर मला वेगळं वाटलं नसतं. त्याची मला नक्कीच कोणतीही अडचण झाली नसती. पण BCCI आशिया चषक पाकिस्तानच्या बाहेर तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही," असे रमीझ राजांनी ठणकावले.

"बीसीसीआयने क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये. भारतातील क्रिकेट चाहत्यांना शाहीन आफ्रिदी आणि बाबर आझम यांना भारतात खेळताना पाहायचे आहे, तर पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पाकिस्तानात खेळावे अशी इच्छा आहे. मात्र, आशिया चषकाबाबतचा BCCIने घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तान आणि भारत यांच्यात द्वेष निर्माण होत आहे," असा आरोप रमीझ राजाने केला.

"भारताने ज्या प्रकारे पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळणार नसल्याचे जाहीर केले, ते योग्य नव्हते. आशियाई क्रिकेट परिषदेच्या सदस्यांशी सल्लामसलत न करता त्यांनी हे विधान जारी केले. भारताला पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशावर अशाप्रकारे दादागिरी करण्याचा अधिकार नाहीये," अशा शब्दांत रमीज राजाने भारताला वॉर्निंग दिली.