India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : भारत-श्रीलंका दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात हेल्मेटला चेंडू आदळल्यानंतर इशान किशनला ( Ishan Kishan) शनिवारी CT-Scan साठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट नॉरमल आला असला तरी आज होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात तो खेळणार नसल्याचे BCCIने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात बदल पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे.
भारताच्या डावातील चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशानला दुखापत झाली. लाहिरू कुमाराने टाकलेला बाऊन्सर थेट इशानच्या हेल्मेटवर आदळला आणि त्यानंतर तो मैदानावर बसला. प्राथमिक उपचार घेऊन त्याने पुन्हा फलंदाजी केली. मात्र, १५ चेंडूंत १६ धावा करून तो माघारी परतला. इशानला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. पण, तो आजच्या सामन्यात खेळणार नाही. बीसीसीआयची वैद्यकिय टीम त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे.
ऋतुराद गायकवाड याला मनगटाच्या दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागल्यानंतर इशान व रोहित शर्मा ही जोडी सलामीला खेळली. इशानने पहिल्या सामन्यात दमदार खेळ करून दाखवला, परंतु दुसऱ्या सामन्यात तो १६ धावाच करू शकला. ऋतुराजच्या माघारीमुळे मयांक अग्रवाल याचा ट्वेंटी-२० संघात समावेश करण्यात आला होता आणि तो आज ट्वेंटी-२०त पदार्पण करण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाने दुसरा सामना ७ विकेट्स राखून जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर १८४ धावांचे लक्ष्य सहज पार केले. श्रेयसने नाबाद ७४, तर जडेजाने १८ चेंडूंत नाबाद ४५ धावा चोपल्या. या सामन्यानंतर रोहितने तिसऱ्या सामन्यात बदलाचे संकेत दिले होते.
मयांकसह कुलदीप यादव, रवी बिश्नोई आणि आवेश खान हेही संधीच्या शोधात आहेत. रोहितही विश्रांती करण्याची शक्यता आहे, परंतु आता इशानच्या माघारीमुळे त्याबाबत संभ्रमच आहे. ''संघबदलाबाबत उद्या निर्णय घेतला जाईल. आतापर्यंत आम्ही २७ खेळाडूंना संधी दिली आणि अजूनही काही बाकी आहेत. आता मालिका जिंकलीच आहे. अजूनही बऱ्याच खेळाडूंना संधी मिळालेली नाही, त्यापैकी काही कसोटी खेळणारे आहेत. शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक कणखरतेचाही विचार करायला हवा,''असे रोहितने सांगितले.
इशानच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन व रोहित सलामीला खेळू शकतात. असा असेल संघ - संजू सॅमसन, रोहित शर्मा/मयांक अग्रवाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह ( कर्णधार), आवेश खान, मोहम्मद सिराज.