आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरस रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया चषक स्पर्धेच्या आजच्या लढतीसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात हे दोन्ही संघ समोरासमोर आले की तणावजन्य परिस्थिती निर्माण होणे साहजिकच आहे. अशाच 'हाय व्होल्टेज' सामन्यांवर टाकलेला हा दृष्टीक्षेप...
2017 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम लढत, पाकिस्तानचा 180 धावांनी विजय - फाखर झमानचे शतक आणि अझर अली व मोहम्मद हाफिज यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 50 षटकांत 4 बाद 338 धावा चोपल्या. प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण डाव 30.3 षटकांत 158 धावांत गडगडला.
2017 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, भारताचा 124 धावांनी विजय ( डकवर्थ लुईस प्रणाली) - भारताने सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला नमवून स्पर्धेत दणक्यात सुरूवात केली. रोहित शर्मा (91), शिखर धवन ( 68), विराट कोहली (81) आणि युवराज सिंग ( 53) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 319 धावांचा डोंगर उभा केला. पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तानसमोर विजयासाठी 41 षटकांत 289 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 33.3 षटकांत 164 धावांवर माघारी परतला.
आयसीसी विश्वचषक 2015, भारताचा 76 धावांनी विजय - विराट कोहलीच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने 7 बाद 300 धावा चोपल्या. शिखर धवन आणि सुरेश रैना यांनीही 70 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पाकिस्तानला 224 धावांवरच समाधान मानावे लागले.
2015 आशिया चषक, पाकिस्तानचा 1 विकेट राखून विजय - शाहिद आफ्रिदीने 18 चेंडूंत चोपलेल्या नाबाद 34 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 246 धावांचे लक्ष्या दोन चेंडू व एक विकेट राखून पार केले.
2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, भारताचा 8 विकेट राखून विजय ( डकवर्थ लुईस प्रणाली) - पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 40-40 षटकांचा खेळवण्यात आला होता. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 39.4 षटकांत 165 धावा करू शकला, परंतु पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने भारतासमोर 22 षटकांत 102 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. शिखर धवनच्या 48 धावांनी भारताला विजय मिळवून दिला.