भारतीय संघाने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा ट्वेंटी-20 सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. या विजयासह भारताने ट्वेंटी-20 मालिकेची अपराजित मालिका कायम राखली.
डी. शॉर्ट आणि अॅरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी 68 धावांची भागीदारी केली.
कुलदीप यादवने फिंचला बाद करताना ही जोडी तोडली. त्यापाठोपाठ शॉर्टही कृणाला पांड्याच्या गोलंदाजीवर माघारी फिरला.
कृणालने ऑस्ट्रेलियाला धक्के देत सामन्यात रंगत आणली. ऑस्ट्रेलियात भारतीय फिरकीपटूने केलेल्या सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम कृणालने ( 4/36) नावावर केला.
ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक अॅलेक्स करी (27) आणि मार्कस स्टोइनिस (25) यांनी फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
विजयासाठी 165 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली.
रोहित ( 23) माघारी परतल्यानंतर धवनने सुरेख खेळ करताना 22 चेंडूंत 41 धावा चोपल्या. त्यात 6 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता.
धवनच्या फटकेबाजीनंतर कर्णधार विराट कोहलीची बॅट तळपली. त्याने 41 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 61 धावा केल्या. त्याची ही खेळी विश्वविक्रमी ठरली.
दिनेश कार्तिकनेही सुरेख साथ देताना ( 22*) भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली.