टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड; विंडीजला नमवून पाकिस्तानचे वस्त्रहरण!

भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दणदणीत विजय मिळवून वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली.

शुबमन गिल ( ८५), इशान किशन ( ७७), हार्दिक पांड्या ( ७०*) व संजू सॅमसन ( ५१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ५ बाद ३५१ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मुकेश कुमारने पहिल्याच स्पेलमध्ये विंडीजचे ३ फलंदाज १७ धावांवर तंबूत पाठवले. शार्दूल ठाकूरने ४ व कुलदीप यादवने २ धक्के दिले आणि भारताचा दणदणीत विजय पक्का केला. वेस्ट इंडिजचा संघ १५१ धावांत तंबूत परतला.

भारताचा हा विंडीजविरुद्धचा सलग १३ वा वन डे मालिका विजय ठरला. २००७ पासून भारतीय संघ अपराजित आहे. भारताने सलग १३वी मालिका जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. एकाच संघाविरुद्ध सलग सर्वाधिक मालिका जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड... त्यानंतर पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध सलग ११ वन डे मालिका जिंकल्या आहेत.

इशान किशन, शुबमन गिल, संजू सॅसमन व हार्दिक पांड्या या चार फलंदाजांनी अर्धशतक झळकावून भारताला ५ बाद ३५१ धावांचा डोंगर उभा करून दिला. इशान व शुबमन यांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावा जोडल्या अन् ही वेस्ट इंडिमधील भारतीय सलामीवीरांची सर्वोत्तम भागीदारी ठरली.

वेस्ट इंडिजविरुद्धची ही वन डे तील भारताची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी २६ जून २००९मध्ये भारताने ६ बाद ३३९ धावा केल्या होत्या आणि तो सामना २० धावांनी जिंकला होता. विंडीजकडून शिवनारायण चंद्रपॉलने सर्वाधिक ६३ धावा केल्या होत्या. युवराज सिंगने १०२ चेंडूंत १३१ धावा चोपल्या होत्या.

भारताच्या फलंदाजांच्या फळीतील पहिल्या पाचपैकी चौधांनी अर्धशतक झळकावण्याची ही सातवी वेळ आहे. भारताने २०० धावांनी ही मॅच जिंकली आणि वेस्ट इंडिजविरुद्धचा हा दुसरा मोठा विजय ठरला. २०१८मध्ये भारताने २२४ धावांनी विजय मिळवला होता.