Team India Fixtures: टीम इंडियाचं होम ग्राउंडवरील वेळापत्रक; कधी आणि कुठल्या संघाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी!

BCCI Unveils Team Indias 2026-27 Home Fixtures: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! बीसीसीआयने आगामी आंतरराष्ट्रीय घरच्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १७ शहरांमध्ये तब्बल २२ सामने रंगणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या २०२६-२७ च्या आंतरराष्ट्रीय घरच्या हंगामाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या आगामी हंगामात भारतीय संघ वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार आहे

विशेष म्हणजे, देशभरातील १७ शहरांमध्ये एकूण २२ आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार असून, क्रिकेट चाहत्यांना विराट कोहली, हार्दिक पांड्या यांसारख्या स्टार खेळाडूंना प्रत्यक्ष मैदानात पाहण्याची मोठी संधी मिळणार आहे.

वेस्ट इंडिजचा भारत दौरा (सप्टेंबर २०२६): भारतीय हंगामाची दणक्यात सुरुवात २७ सप्टेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेने होईल. या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळले जातील.

श्रीलंकेचा भारत दौरा (डिसेंबर २०२६): वर्षाच्या अखेरीस, डिसेंबर महिन्यात श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येईल. या मालिकेत प्रत्येकी ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने होतील.

झिम्बाब्वेचा भारत दौरा (जानेवारी २०२७): २०२७ सालाची सुरुवात झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेने होईल. जानेवारीमध्ये झिम्बाब्वेचा संघ ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारत दौरा करेल.

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (जानेवारी - फेब्रुवारी २०२७): हंगामाचा सर्वात मोठा थरार म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका. २१ जानेवारी २०२७ पासून नागपूरमध्ये या ऐतिहासिक मालिकेचा थरार सुरू होईल.

यादरम्यान, भारत कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मिळून एकूण २२ सामना खेळणार आहे. हे सामने एकूण १७ शहरांत खेळले जाणार आहे. हा हंगाम भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, विविध राज्यांमधील चाहत्यांना आपल्या लाडक्या संघाला पाठिंबा देण्याची संधी मिळणार आहे.