IND vs NZ, Sanju Samson: "...म्हणून संजू सॅमसनला खेळवलं नाही", कॅप्टन शिखर धवनने सांगितलं महत्त्वाचं कारण

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील दुसरा सामना पावसाच्या कारणास्तव रद्द करण्यात आला.

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेचा थरार रंगला आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून किवी संघाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती. मात्र आज होणारा दुसरा सामना पावसाच्या कारणास्तव रद्द करण्यात आला. त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. आता आगामी तिसरा सामना निर्णायक सामना असणार आहे.

दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १२.५ षटकांत १ गडी गमावून ८९ धावा केल्या होत्या, मात्र अचानक पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबला अखेर सामना देखील रद्द करावा लागला. मात्र या सामन्यात पुन्हा एकदा संजू सॅमसनला वगळण्यात आल्याने प्लेइंग इलेव्हनवरून वाद निर्माण झाला आहे.

खरं तर संजू सॅमसनने पहिला वनडे सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याने ३६ धावांची शानदार खेळी केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. प्लेइंग इलेव्हन समोर आल्यानंतर सोशल मीडियावरून चाहत्यांनी बीसीसीआयला ट्रोल करण्यास सुरूवात केली. संजू सॅमसनसोबत होत असलेल्या भेदभावामुळे बीसीसीआयला प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सामन्याबाबत कर्णधार शिखर धवन म्हणाला की, हवामानाचे आपल्या हातात काहीच नाही, आम्ही फक्त पाऊस थांबण्याची वाट पाहत होतो पण शेवटी निकाल आपल्या बाजूने लागला नाही. खेळपट्टी पाहून आम्हाला आश्चर्य वाटले, कारण सुरुवातीला असे वाटत होते की येथे स्विंग असेल पण ती फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी निघाली. काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे मात्र संघ मजबूत आहे आणि आमच्याकडे अनेक पर्याय आहेत.

अशातच कर्णधार शिखर धवनने संजू सॅमसनला वगळण्याचे कारण सांगितले आहे. शिखर धवन म्हणाला की, आम्हाला सहाव्या गोलंदाजीचा पर्याय वापरायचा होता, त्यामुळेच दीपक हुडाला प्लेइंग इलेव्हनमध्ये आणण्यात आले आणि संजू सॅमसनला बाहेर बसावे लागले. तसेच दीपक चहरचे पुनरागमन झाले कारण तो स्विंगसोबतच फलंदाजी देखील करू शकतो.

दुसऱ्या वनडे सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने १ गडी गमावून ८९ धावा केल्या, शुबमन गिलने ४५ आणि सूर्यकुमार यादवने ३५ धावा केल्या तर शिखर धवन फक्त तीन धावा करू शकला. सामना प्रथम ५० षटकांवरून २९ षटकांचा, नंतर २९ वरून २० षटकांचा करण्यात आला आणि शेवटी सामना रद्दच करण्यात आला.

तीन वनडे मालिकेत न्यूझीलंड 1-0 ने पुढे आहे. भारतीय संघ आता मालिका काबीज करू शकत नाही, पण शेवटचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी नक्कीच आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने दोन बदल केले, संजू सॅमसन आणि शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक हुडा आणि दीपक चहरला संधी देण्यात आली.