यशस्वी जैस्वालने मैदान गाजवले; गावस्कर, गांगुली, गंभीरसह ५४ वर्षांपूर्वीचे विक्रम मोडले

IND vs WI 1st Test : Yashasvi Jaiswal - कसोटी पदार्पणात सर्वोत्तम धावा करणारा सलामीवीर, रोहित शर्माससह वेस्ट इंडिजमध्ये विक्रमी भागीदारी, पदार्पणात शतक झळकावणारा १७वा भारतीय असे अनेक विक्रम यशस्वी जैस्वालने नावावर केले. त्याच्या अविस्मरणीय खेळीला तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ब्रेक लागला. यशस्वी ३८७ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारांसह १७१ धावांवर झेलबाद झाला.

यशस्वी जैस्वाल हा कसोटी पदार्पणात भारताकडून १५०+ धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी शिखर धवन ( १८७ वि. ऑस्ट्रेलिया २०१३) आणि रोहित शर्मा ( १७७ वि. वेस्ट इंडिज, २०१३) यांनी असा पराक्रम केला होता.

भारताकडून कसोटी पदार्पणात १५०+ धावा करणारा यशस्वी सर्वात युवा फलंदाज ठरला. त्याने ( २१ वर्ष व १९७ दिवस) त्याने सुनील गावस्कर ( २२० वि. वेस्ट इंडिज, १९७१) २१ वर्ष व २७७ दिवसांचा विक्रम मोडला. या विक्रमात माधव आपटे २० वर्ष व १३७ दिवसांसह ( १६३* वि. वेस्ट इंडिज, १९५३) हे अव्वल स्थानी आहेत.

कसोटी पदार्पणात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणाऱ्या ओपनरचा विक्रमही त्याच्या नावे नोंदवला गेला आहे. त्याने आतापर्यंत ३६७* चेंडूंचा सामना केला आहे. न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेने २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३४७ चेंडूंत २०० धावा केल्या होत्या.

पदार्पणात सर्वोत्तम धावसंख्या करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये यशस्वीने ( १७१) तिसरे स्थान पटकावले. त्याने १९६९ सालचा गुंडप्पा विश्वनाथ ( १३७ वि. ऑस्ट्रेलिया ) यांचा विक्रम मोडला. शिखर धवन ( १८७ वि. ऑस्ट्रेलिया, २०१३) आणि रोहित शर्मा ( १७७ वि. वेस्ट इंडिज, २०१३) हे यशस्वीच्या पुढे आहेत.

भारताबाहेर कसोटी पदार्पणात ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी १९९६ मध्ये सौरव गांगुलीने इंग्लंडविरुद्ध १३१ धावा केल्या होत्या.

यशस्वीची १७१ धावांची खेळी ही डॉमिनिका येथील विंडसर पार्कवरील कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. त्याने २०१५मध्ये एडम व्होग्सचा ( १३०* वि. वेस्ट इंडिज) विक्रम मोडला, पाकिस्तानच्या अझर अलीने २०१७मध्ये येथे १२७ धावा केल्या होत्या.

परदेशात भारताच्या डावखुऱ्या फलंदाजाने कसोटीत सर्वोत्तम खेळीच्या विक्रमात यशस्वीने तिसरे स्थान पटकावताना गौतम गंभीरचा ( १६७ वि. न्यूझीलंड, २००९) विक्रम मोडला. या विक्रमात पहिल्या दोन स्थानांवर शिखर धवन आहे. त्याने २०१७मध्ये श्रीलंकेत १९० आणि २०१५ मध्ये बांगलादेशमध्ये १७३ धावा केल्या होत्या.