IND vs SL T20 Series: टीम इंडियाला श्रीलंकेविरूदधच्या मालिकेआधी मोठा धक्का; 'या' स्टार खेळाडूने दुखापतीमुळे घेतली माघार; IPL मध्ये लागली होती कोट्यवधींची बोली

श्रीलंका दौऱ्याची सुरूवात टी२० सामन्यांच्या मालिकेने होणार आहे.

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरूद्ध झालेली टी२० मालिका ३-०ने जिंकली. भारतीय गोलंदाजांनी काहीशी निराशा केली असली तर ती कसर भारताच्या फलंदाजांनी भरून काढली.

कायरन पोलार्डसारख्या धडाकेबाज कर्णधाराच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजच्या दमदार संघाला टी२० मालिकेत हरवणं ही कसोटी होती. पण नवा कर्णधार रोहित शर्मा याने ही किमया करून दाखवली.

वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी२० मालिकेत अनुभवी खेळाडूंनी आपली चमक दाखवलीच, पण त्यासोबतच तुलनेने नवे असलेले सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर यांनीही आपला रूद्रावतार दाखवून दिला.

वेस्ट इंडिजनंतर आता भारताचा संघ श्रीलंकेशी दोन हात करणार आहे. श्रीलंकेच्या भारत दौऱ्याची सुरूवात ३ टी२० सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. २४, २६ आणि २७ फेब्रुवारीला हे सामने खेळण्यात येणार आहेत.

टी२० मालिकेत आधी न्यूझीलंड आणि नंतर वेस्ट इंडिज यांसारख्या संघांना पराभूत केल्याने भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. पण त्याचदरम्यान भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला असून एका स्टार खेळाडूने मालिकेतून माघार घेतल्याचे सांगितलं जात आहे.

भारताचा वेगवान स्विंग गोलंदाज Deepak Chahar हा श्रीलंकेविरूद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दीपकने आगामी टी२० मालिकेतून माघार घेतली आहे. तो एनसीएमध्ये रिहॅब केल्यानंतरच संघात पुनरागमन करेल.

दीपक चहरचा बदली खेळाडू मागवण्यात आलेला नाही कारण गेल्या मालिकेत न खेळलेला जसप्रीत बुमराह यंदाच्या मालिकेसाठी आधीच संघात उपस्थित आहे, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

भारत-विंडिज तिसऱ्या टी२० मध्ये वैयक्तिक दुसरं षटक टाकताना दीपक चहरच्या पायाच्या स्नायूंना दुखापत झाली. त्यानंतर संघाच्या फिजीओने त्याला मैदानाबाहेर नेले.

त्या सामन्यात नंतर दीपक मैदानात परतलाच नाही. त्याने दुसऱ्या षटकातील पाचच चेंडू टाकले होते. पण त्या १.५ षटकात त्याने दोन महत्त्वाचे बळी टिपले होते. त्यानंतर वेंकटेश अय्यरने त्याचे षटक पूर्ण केले.