Rockstar Ravindra Jadeja, IND vs SL, 1st Test Day 3 Live Updates : १७५ धावांची नाबाद खेळी केल्यानंतर रवींद्र जडेजाने गोलंदाजीतही कमाल दाखवाता श्रीलंकेचा निम्मा संघ खिशात घातला. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या फलंदाजांचा फार काळ निभाव लागला नाही. त्यांचा पहिला डाव १७४ धावांवर गुंडाळून टीम इंडियाने त्यांना फॉलोऑन दिला.
मयांक अग्रवाल ( ३३), रोहित शर्मा ( २९), हनुमा विहारी ( ५८), विराट कोहली ( ४५), श्रेयस अय्यर ( २७) व रिषभ पंत ( ९६) यांच्या योगदानानंतर रवींद्र जडेजाची बॅट तळपली. त्याने आणि आर अश्विनने ७व्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. अश्विन ६१ धावांवर माघारी परतल्यानंतर ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसह शतकी भागीदारी केली. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. जडेजा २२८ चेंडूंवर १७ चौकार व ३ षटकारांसह १७५ धावांवर नाबाद राहिला आणि शमीसह ( २०*) त्याने ९व्या विकेटसाठी ९४ चेंडूंत १०३ धावा जोडल्या.
श्रीलंकेच्या फलंदाजांकडून फार संघर्ष पाहायला मिळाला नाही. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक क्षेत्ररक्षण लावताना श्रीलंकेच्या फलंदाजांना चूका करण्यास भाग पाडले. प्रत्येक गोलंदाजासाठी रोहितने अचूक क्षेत्ररक्षण लावले होते आणि हे पाहून महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही कौतुक केले.
श्रीलंकेचा पथूम निसंका ( नाबाद ६१) वगळल्यास कर्णधार दिमूथ करुणारत्न ( २८), चरिथ असलंका ( २९) व अँजेलो मॅथ्यूज ( २२) हे लंकेकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. जसप्रीत बुमराह व आर अश्विन यांनी प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली. रवींद्र जडेजाने ४१ धावांत ५ फलंदाज बाद केले.
रवींद्र जडेजाने या कामगिरीसह कसोटी क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. एकाच कसोटीत १५०+ धावा व पाच विकेट्स घेणारा तो सहावा खेळाडू ठरला. यापूर्वी विनू मांकड (184 & 5/196) वि. इंग्लंड, १९५२, डेनिस अॅटकिंसन (219 & 5/56) वि. ऑस्ट्रेलिया, १९५५, पॉली उम्रीगर ( 172* & 5/107) वि. वेस्ट इंडिज, १९६२, गॅरी सोबर्स ( 174 & 5/41) वि. इंग्लंड, १९६६ आणि मुश्ताक मोहम्मद ( 201 & 5/49) वि. न्यूझीलंड, १९७३ यांनी हा पराक्रम केला आहे.
भारताकडून एकाच कसोटीत १५०+ धावा व ५ विकेट्स घेणारा तो तिसरा खेळाडू ठरला. विनू मांकड (184 & 5/196) वि. इंग्लंड आणि पॉली उम्रीगर ( 172* & 5/107) वि. वेस्ट इंडिज, १९६२ यांनी हा पराक्रम याआधी केला आहे.
एकाच कसोटीत ७व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन १५०+ धावा आणि नंतर गोलंदाजीत पाच विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा हा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या डेनिस अॅटकिंसन यांनी १९५५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१९ धावा व ५/५६ अशी कामगिरी केली होती.
एकाच कसोटीत शतक व पाच विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा चौथा भारतीय ठरला. विनू मांकड वि. इंग्लंड ( १९५२), पॉली उम्रीगर वि. वेस्ट इंडिज ( १९६२), आर अश्विन वि. वेस्ट इंडिज ( २०११ व २०१६) आणि वि. इंग्लंड ( २०२१) यांनी हा पराक्रम केला आहे.