"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच

Yashasvi Jaiswal on Rohit Sharma: रोहित शर्माचं मैदानावरचं वागणं कायम चर्चेत असतं...

टीम इंडियाने कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडे मालिकेत दमदार कमबॅक केले. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकत आपले वर्चस्व गाजवले.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन बड्या खेळाडूंनी आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला मोठे विजय मिळवून दिले. विराटने दोन शतकेही ठोकली.

रोहित आणि विराट यांच्या दमदार खेळीमुळेच त्यांना ताज्या फलंदाजांच्या क्रमवारीत पहिला आणि दुसरा क्रमांक मिळाला आहे. नव्या खेळाडूंनाही त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे.

युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल रोहित शर्मासोबत मुंबईच्या रणजी संघापासून खेळत आलेला आहे. त्यामुळे त्याला रोहितबाबत खूप गोष्टी माहिती असून त्यांचे बॉन्डिंग खूपच चांगले आहे.

तसे असले तरीही रोहित शर्मा मैदानावर जेव्हा एक गोष्ट करतो तेव्हा मात्र यशस्वी आणि इतर नवोदित खेळाडूंना खूपच विचित्र आणि चुकल्याचुकल्यासारखे वाटते असे जैस्वाल म्हणाला.

यशस्वी जैस्वाल म्हणाला, "रोहित भाई मैदानात जेव्हा आमच्यावर ओरडतो तेव्हा त्यात त्याचे प्रेम असते. तो कायमच चांगल्यासाठी ओरडतो हे आम्हा सगळ्यांना माहिती असते."

"पण जेव्हा रोहितभाई मैदानात असूनही आमच्यावर ओरडत नाही, तेव्हा आम्हाला खूप विचित्र वाटते. आमच्या मनात असं येत असतं की, आपलं काही चुकलं असेल का?" असे जैस्वाल म्हणाला.