IND vs SA: विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार असायला हवा; भारताच्या माजी खेळाडूची मागणी

Indian Test Team Captain: भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून, तिथे कसोटी मालिका खेळवली जात आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना टीम इंडियाला गमवावा लागला. भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो यजमान संघाला विजय देऊन गेला.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

भारताच्या दारूण पराभवानंतर संघाचा माजी खेळाडू एस.बद्रीनाथने थेट कर्णधार बदलण्याचीच मागणी केली. भारताचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर एस बद्रीनाथ म्हणाला की, विराट कोहली भारतीय कसोटी संघाचा कर्णधार असायला हवा, रोहित शर्माची आणि त्याची तुलना मी करत नाही.

"विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळायला हवे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची तुलना होऊ शकत नाही, किंबहुना मी करतही नाही. पण, कसोटी क्रिकेटमध्ये विराट मोठा खेळाडू आहे", असे बद्रीनाथने म्हटले.

कर्णधारपदाच्या काळात विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट विक्रम आहे. कर्णधार असताना त्याने ५३ च्या सरासरीने ५,००० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वात संघाने ४० कसोटी सामने जिंकले आहेत. मग तो भारतीय कसोटी संघाचा कर्णधार का नाही? तो संघातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज आहे, असेही त्याने सांगितले.

विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ११२ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १८९ डावात ४९.३८ च्या सरासरीने ८७९० धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर २९ शतकांची आणि २९ अर्धशतकांची नोंद आहे, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २५४ नाबाद आहे. कोहलीने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. किंग कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास २००८ पासून सुरू झाला.