विराट-रोहितही जिथे झाले 'नापास', त्याच मैदानावर राहुलने ठोकला विक्रमांचा जबरदस्त 'चौकार'

KL Rahul, IND vs SA 1st Test: राहुलने १४ चौकार अन् ४ षटकारांच्या साथीने साजरं केलं शतक

KL Rahul Rohit Sharma Virat Kohli, IND vs SA 1st test: यजमान दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताचा पहिला डाव २४५ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या दिवशी गडगडलेल्या भारतीय डावाला उपकर्णधार केएल राहुलच्या शतकामुळे आधार मिळाला.

रोहित शर्मा, विराट कोहली यांसारखे अनुभवी फलंदाज सेंच्युरियनच्या मैदानावर पूर्णपणे अपयशी ठरले. पण राहुल मात्र मैदानात पाय रोवून उभा राहिला. राहुलने १४ चौकार आणि ४ षटकारांसह १०१ धावा केल्या. राहुलने दमदार शतक ठोकून विक्रमांचा चौकारही लगावला.

सेंच्युरियनमध्ये दोन कसोटी शतके झळकावणारा केएल राहुल हा जगातील पहिला विदेशी फलंदाज ठरला. याआधी 2021 मध्ये राहुलने सेंच्युरियनमध्येच १२३ धावांची इनिंग खेळली होती.

केएल राहुल पहिल्यांदाच यष्टिरक्षक म्हणून कसोटी सामना खेळायला आला आणि त्याने पहिल्याच डावात शतक झळकावण्याचा पराक्रम केला.

SENA देशांमध्ये कसोटी शतक झळकावणारा KL राहुल हा भारताकडून फक्त दुसरा यष्टिरक्षक आहे. यापूर्वी हा पराक्रम ऋषभ पंतने केला होता.

केएल राहुलने 26 डिसेंबर रोजी 2 शतके झळकावण्याचा पराक्रम केला. गेल्या वेळी राहुल दक्षिण आफ्रिकेत गेला होता तेव्हा त्याने बॉक्सिंग डे कसोटीत शतक झळकावले होते.