IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...

IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचले आहेत. गेल्या १८ वर्षांत भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात कधीही एकमेकांविरुद्ध खेळले नाहीत. त्यामुळे, आजचा सामना केवळ आशिया कप विजेतेपदाचा नाही, तर जुन्या पराभवांचा बदला घेऊन एक नवीन इतिहास रचण्याची संधी आहे.

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत. हा सामना केवळ विजेतेपदासाठी नसून, गेल्या काही वर्षांतील फायनलमधील अपयशाचा बदला घेण्यासाठी भारतासाठी एक मोठी संधी आहे. आकडेवारीनुसार, फायनलमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. त्यामुळे, आजचा सामना भारतासाठी जुने हिशेब चुक्ता करणारा ठरू शकतो.

आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचले आहेत. भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली आहे, तर पाकिस्तानने संघर्ष करून आपले स्थान निश्चित केले आहे.

१९८५ वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट: मेलबर्नमध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १७६ धावा केल्या, तर भारताने कृष्णमाचारी श्रीकांत आणि रवी शास्त्री यांच्या अर्धशतकांच्या मदतीने ४७.१ षटकांत विजय मिळवला.

१९८६ ऑस्ट्रल एशिया कप: शारजाहमध्ये झालेला हा सामना सर्वात संस्मरणीय मानला जातो. जावेद मियांदादने चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून पाकिस्तानला १ गडी राखून थरारक विजय मिळवून दिला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने सात विकेट्सने २४५ धावा केल्या होत्या.

१९९१ विल्स ट्रॉफी: विल्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ६ बाद २६२ धावा केल्या, परंतु भारतीय संघ लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला आणि १९० धावांवर गारद झाला. त्या सामन्यात पाकिस्तानकडून आकिब जावेदने ३७ धावांत सात बळी घेतले होते.

१९९४ ऑस्ट्रल कप: शारजाह येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने आपले वर्चस्व कायम ठेवले. या सामन्यात पाकिस्तानने २५० धावा केल्या, लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ २११ धावांवर गारद झाला आणि त्यांना ३९ धावांनी पराभव पत्करावा लागला.

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सिल्व्हर ज्युबिली कप नावाची मालिका खेळवण्यात आली. खासियत अशी की या स्पर्धेचे एकूण तीन अंतिम सामने ढाका येथे खेळवण्यात आले. भारतीय संघाने पहिला अंतिम सामना आठ विकेट्सने जिंकला, तर दुसरा पाकिस्तानने सहा विकेट्सने जिंकला. तिसरा अंतिम सामना निर्णायक होता, जिथे भारताने जेतेपद एक चेंडू शिल्लक असताना तीन विकेट्सने जिंकला.

सिल्व्हर ज्युबिली कप नंतर पुढच्या वर्षी पेप्सी कप आयोजित करण्यात आला होता आणि भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भिडले होते. बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या त्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने १२३ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २९१ धावा केल्या, परंतु भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग करू शकला नाही आणि त्यांचा डाव १६८ धावांवर आटोपला.

पेप्सी कप जिंकल्यानंतर लगेचच, भारत आणि पाकिस्तान कोका-कोला कपमध्ये एकमेकांसमोर आले. पाकिस्तानने १३२ चेंडू शिल्लक असताना आठ विकेट्सने विजय मिळवला. त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली, परंतु त्यांचा डाव १२५ धावांवर आटोपला.

२००७ मध्ये, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, गौतम गंभीरच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान १५२ धावांवर सर्वबाद झाला आणि भारतीय संघाने सामना पाच धावांनी जिंकला.

टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर दुसऱ्या वर्षी, किटप्लाय कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने तीन बाद ३१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ फक्त २९० धावा करू शकला आणि अशा प्रकारे पाकिस्तानने २५ धावांनी सामना जिंकला.

२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. हा सामना लंडनमध्ये खेळला गेला आणि पाकिस्तानने १८० धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने चार विकेट गमावून ३३८ धावा केल्या आणि भारतासमोर मोठे लक्ष्य ठेवले, परंतु भारतीय संघ १५८ धावांवर सर्वबाद झाला.

गेल्या १८ वर्षांत भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात कधीही एकमेकांविरुद्ध खेळले नाहीत. त्यामुळे, आजचा सामना केवळ आशिया कप विजेतेपदाचा नाही, तर जुन्या पराभवांचा बदला घेऊन एक नवीन इतिहास रचण्याची संधी आहे.