हार्दिक पंड्यानं असा कोणता संदेश दिला की शुभमन गिलनं मैदान गाजवलं; अखेर गुपीत उघड! वाचा...

न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताचा युवा सलामीवर शुभमन गिल यानं वादळी खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. शुभमन यानं नाबाद १२६ धावांची तुफान खेळी केली.

शुभमनच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं न्यूझीलंड विरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका २-१ अशा फरकानं जिंकली. मालिका विजयासह भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याच्या नेतृत्व गुणांचंही खूप कौतुक झालं. हार्दिक पंड्यानं संघातील प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देत त्यांच्यावर विश्वास दाखवत कर्णधारी कामगिरी केली.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद १२६ धावांची खेळी करणाऱ्या फलंदाज शुभमन गिलने सांगितले की, त्याने आपल्या शानदार खेळीत काही वेगळे केले नाही आणि आपला नैसर्गिक खेळ केला.

"जेव्हा तुम्ही खूप सराव करता आणि त्याचा फायदा होतो, तेव्हा छान वाटतं. संघासाठी चांगली खेळी केल्याचा खूप आनंद आहे. षटकार मारण्याचे प्रत्येकाचे स्वतःचे तंत्र असते", असं शुभमन म्हणाला. तसंच सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्या वेळोवेळी शुभमन याला काही सल्ले देताना पाहायला मिळाला.

हार्दिकनं तुला नेमका कोणता सल्ला किंवा सूचना दिली याबाबत विचारलं असता गिल म्हणाला, 'हार्दिक भाईने मला माझा नैसर्गिक खेळ खेळायला सांगितले आणि मला काही अतिरिक्त करण्याची गरज नाही असा सल्ला दिला'

कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की मैदानावर निर्णय घेताना तो सहसा आपलं मन काय सांगतंय ते ऐकतो. पंड्या म्हणाला, "मी नेहमीच याच पद्धतीनं खेळत आलो आहे. मी परिस्थिती समजून घेतो आणि काळाच्या गरजेनुसार निर्णय घेतो". पराभवामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने देखील 'उत्कृष्ट' क्रिकेट खेळल्याबद्दल भारताचे कौतुक केले.

या सामन्यात भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात २३४ धावा केल्या होत्या. शुभमन गिलच्या नाबाद १२६ धावांच्या व्यतिरिक्त सूर्यकुमार यादवनं २४, राहुल त्रिपाठीने ४४ आणि कर्णधार हार्दिक पंड्याने ३० धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १२.१ षटकांत अवघ्या ६६ धावांत आटोपला.

न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक ३५ धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सँटनरने १३ धावा केल्या. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. हार्दिकने ४, अर्शदीप, उमरान मलिक आणि शिवम मावीने प्रत्येकी २ बळी घेतले.