Hardik Pandya, IND vs NZ: "आम्ही जिंकलो असलो तरीही..."; न्यूझीलंडवर विजयानंतर कर्णधार हार्दिकचं महत्त्वाचं विधान

सूर्यकुमार यादव, दीपक हुडाचं केलं कौतुक पण...

Hardik Pandya, IND vs NZ T20: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने (Team India) तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि दीपक हुडा (Deepak Hooda).

सूर्याने फटकेबाजी करत १११ धावांची नाबाद खेळी केली. त्याच वेळी दीपक हुडाने गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी करत चार खेळाडूंना तंबूत धाडले. टीम इंडियाच्या विजयानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आनंदी होता. मात्र, त्याने आपल्या फलंदाजांकडून एक विशेष मागणी केली.

"दीपक हुडा हा मुख्यत: मधल्या फळीतील फलंदाज असला तरी तो गोलंदाजीतही सक्षम आहे. अशाच प्रकारचे आणखी खेळाडू तयार झाले तर संघाला नक्कीच फायदा होईल. मैदान खूप ओले होते, त्यामुळे याचे श्रेय गोलंदाजांना जाते. मी खूप गोलंदाजी केली आहे. भविष्यात मला आणखी गोलंदाजीचे पर्याय पाहायचे आहेत."

"जेव्हा सामन्यात फलंदाज म्हणून खेळत असलेल्या खेळाडूच्या हाती चेंडू दिला जातो, त्यावेळी तो खेळाडू गोलंदाजीत यशस्वी होईलच असे नसते. दीपक हुडाने चांगली कामगिरी केली. आम्ही जिंकलो असलो तरीही बाकीच्या फलंदाजांनी देखील गोलंदाजी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून संघाला गोलंदाजीचे अधिक चांगले पर्याय मिळतील."

"नेहमीच हा प्लॅन चालेल असे नाही, पण मला अधिक फलंदाजांनी गोलंदाजीतही योगदान द्यावे असे वाटते आणि जर तसे झाले तर त्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि त्यासाठी आवश्यक आक्रमकता त्यांच्या मानसिकतेत होती."

"पण गोलंदाजीतील आक्रमकता म्हणजे याचा अर्थ प्रत्येक चेंडूवर विकेट घेणे असा होत नाही. खेळाची समज घेत आक्रमण करणे महत्त्वाचे आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करत असताना कर्णधार म्हणून माझे काम आहे की मी संघाला ड्रेसिंग रूममध्ये योग्य ते वातावरण देणे. त्यामुळे संघ आपोआप दमदार कामगिरी करेल," असे हार्दिक म्हणाला.