टी 20 वर्ल्डकप सुरू आहे. टीम इंडिया या स्पर्धेत जोरदार खेळी करत सेमी फायनलपर्यंत येऊन पोहोचली आहे. १० नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सेमीफायनलसाठी सामना होणार आहे. हा सामना एडिलेड मध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया पूर्ण ताकदीने उतरणार आहे, यासाठी प्लेइंग इलेव्हन मध्ये कोण प्लेअर्स असणार याची चर्चा सुरू असून काल कर्णधार रोहित शर्मा याने यावर भाष्य केले आहे.
नॉकआऊट गेममध्ये चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. आपण कुठून आलो आहोत याचा अभिमान असणे संघ म्हणून महत्त्वाचे आहे. जिंकण्यासाठी उद्या चांगली खेळी करावी लागणार आहे. नॉकआऊट सामन्यांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करत असाल तर तुम्हाला आत्मविश्वास मिळतो.
यावेळी रोहित शर्माला पत्रकारांनी प्लेइंग इलेव्हन संदर्भत प्रश्न विचारले. या सामन्यात ऋषभ पंत की दिनेश कार्तिक कोणाला स्थान मिळणार यावर रोहितने उत्तर दिले. 'झिम्बाब्वे सामन्यापूर्वी आम्हाला माहित नव्हते की आमचा उपांत्य सामना कोणासोबत होईल.
ऋषभने या दौऱ्यात अनधिकृत सराव सामना वगळता एकही सामना खेळला नाही, त्यामुळे आम्हाला त्याला एक सामना द्यायचा होता. आम्हाला डावखुरा फलंदाज हवा असेल तर झिम्बाब्वेविरुद्ध पंतला आणले. दोन्ही यष्टिरक्षक पुढील सामन्यासाठी उपलब्ध आहेत. दोघांपैकी कोण खेळणार हे उद्या ठरेल, असं रोहित म्हणाला.
जबाबदारी स्वीकारण्यासाठी सूर्यकुमार यादवकडे परिपक्वता आहे आणि याचा त्याच्यासोबत फलंदाजी करणाऱ्या इतर खेळाडूंवर परिणाम होतो. त्याला लहान मैदानावर खेळावयला आवडत नाही. तर तो मोठ्या मैदानावर खेळण्यास प्राधान्य देतो, असंही रोहित म्हणाला.