भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये टी-२० विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना हा आज अॅडिलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक वरचढ खेळाडू आहेत. ते स्वत:च्या हिमतीवर एकहाती सामन्याचे पारडे फिरवू शकतात. इंग्लंडच्या संघातही तीन धोकादायक खेळाडू आहेत. ज्यांच्यापासून भारतीय संघाला सावध राहावे लागेल. कोण आहेत ते खेळाडू पाहुयात.
अॅलेक्स हेल्सचे इंग्लंडच्या संघामध्ये तीन वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे. राष्ट्रीय संघात आल्यापासून हेल्स धमाकेदार कामगिरी करत आहे. तो सहजासहजी आपली विकेट गमावत नाही. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ४ सामन्यांमधून त्याने १२५ धावा काढल्या आहेत.
अॅलेक्स हेल्स सुरुवातीच्या दोन सामन्यात फारसा चमकला नाही. मात्र नंतर त्याने धडाकेबाज खेळ करताना न्यूझीलंडविरुद्ध ५२ आणि श्रीलंकेविरुद्ध ४७ धावा काढल्या.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला आव्हानांचा सामना करण्यासाठी ओळखले जाते. सध्याच्या वर्ल्डकपमध्ये बेन स्टोक्सने त्याची सर्वोत्तम कामगिरी अद्याप केलेली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने ४२ धावांची खेळी केली होती. त्याआधीच्या तीन सामन्यांत त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. तसेच गोलंदाजीमध्येही त्याने ४ सामन्यात ५ बळी टिपले आहेत.
वेगवान गोलंदाज मार्क वुड सातत्याने १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे. या वर्ल्डकपमध्ये ७.५च्या इकॉनॉमीने एकूण ९ बळी टिपले आहेत.
मार्क वुड हा पॉवर प्लेमध्ये अधिकच घातक ठरतो. त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजांना मोकळेपणाने खेळता येत नाही. अचूक लाइन आणि लेंग्थसह गोलंदाजी करणारा वुड सेमीफायनलमध्ये भारतासाठी मोठा धोका निर्माण करू शकतो.