भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गडगडल्यानंतर इंग्लंडनं प्रत्युत्तरात २९० धावा करून ९९ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारतानं दुसऱ्या डावात ४६६ धावा कुटल्या व इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडला हे आव्हान पेलवलं नाही.
पहिल्या डावात शार्दूल ठाकूरच्या ५७ धावा महत्त्वपूर्ण ठरल्या. त्यामुळेच टीम इंडियानं १९१ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावात रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी चांगली सुरूवात करून दिल्यानंतर चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांनी चांगली साथ दिली.
रोहित शर्माचे शतक अन् शार्दूल ठाकूर व रिषभ पंत यांचे अर्धशतक हे दुसऱ्या डावातील महत्त्वाचे टप्पे ठरले. त्यांच्या जोरावर टीम इंडियानं तगडे आव्हान ठेवले. पाचव्या दिवसाच्या लंच ब्रेकनंतर रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी डाव पलटवला. शार्दूलन इंग्लंडचा कर्णधार जो रूटची विकेट घेत भारताचा विजय पक्का केला.
दुसऱ्या डावात उमेश यादवनं सर्वाधिक तीन, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यात जसप्रीत बुमराहनं कसोटीतील १०० विकेट्स पूर्ण केल्या आणि सर्वात जलद हा पल्ला पार करण्याचा विक्रम नावावर नोंदवला.
शार्दुल ठाकूरनं या कसोटीत दोन्ही डावांत ८व्या क्रमांकावर येताना ५०+ धावा केल्या. शिवाय त्यानं याच कसोटीत ३ पेक्षा अधिक विकेट्स घेत मोठा विक्रम नोंदवला. भुवनेश्वर कुमार याच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये १९६९नंतर भारतीय गोलंदाजांनाच अशी कामगिरी करता आली आहे.
१९७१नंतर ओव्हलमधील भारताचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतानं १९७१मध्ये ४ विकेट्सनं बाजी मारली होती आणि ५० वर्षांनंतर विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं इतिहास रचला.
एकाच मालिकेत लॉर्ड्स व ओव्हल कसोटी जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक ५ वेळा ( 1930, 1948, 1972, 2001, 2015), वेस्ट इंडिजनं चारवेळा ( 1950, 1973, 1984, 1988) व पाकिस्ताननं तीनवेळा ( 1992, 1996, 2016) हा पराक्रम केला आहे. न्यूझीलंड ( १९९९) व दक्षिण आफ्रिका ( २०१२) यांना प्रत्येकी एक वेळा अशी कामगिरी करता आली आहे.
परदेशात पहिल्या डावात २००च्या आत संघ गडगडूनही टीम इंडियानं मिळवलेला हा तिसरा विजय ठरला. यापूर्वी २००६मध्ये किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजवर ४९ धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात भारताचा पहिला डाव २०० धावांवर गडगडला होता. २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला डाव १८७ धावांवर गडगडूनही भारतानं तो सामना ६३ धावांनी जिंकला होता.
कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा ३८ वा कसोटी विजय आहे. ग्रॅमी स्मिथ ( ५३), रिकी पाँटिंग ( ४८) आणि स्टीव्ह वॉ ( ४१) हे विराटपेक्षा अधिक कसोटी विजय मिळवणारे कर्णधार आहेत. परदेशातील विराटचा हा १५ वा कसोटी विजय आहे.
या सामन्यातील शतकवीर रोहित शर्माला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. रोहितचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३५वे मॅन ऑफ दी मॅच आहे. त्यानं युवराज सिंगचा ( ३४) विक्रम मोडला. सचिन तेंडुलकर ( ७६), विराट कोहली ( ५७), सौरव गांगुली ( ३७) हे आघाडीवर आहेत.