IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल

ND vs ENG 4th Test Day 5 Live Updates: भारतीय संघाने पहिले दोन गडी शून्यावर गमावले. त्यानंतर अनुभवी केएल राहुल आणि कर्णधार शुबमन गिल यांनी दीडशतकी भागीदारी करत भारतीयांना आशेचा किरण दाखवला. आजच्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी काही महत्त्वाचे घटक सामन्याच्या निकालात मोठी कामगिरी बजावणार आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या मँचेस्टर कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या डावात आक्रमक कामगिरी केली. चौथा दिवस संपला तेव्हा भारतीय संघाने २ विकेट गमावून १७४ धावा केल्या. शुबमन गिल (७८) आणि केएल राहुल (८७) हे नाबाद राहिले.

डावाच्या सुरूवातीला यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन शून्यावर बाद झाले होते. पण गिल-राहुल जोडीने १७४ धावांची भागीदारी करून भारताच्या आशा पल्लवित केल्या. अशा परिस्थितीत, पाचव्या दिवसाच्या खेळात सामन्याचा निकाल ५ घटक ठरवतील

कर्णधार गिल आणि राहुल यांनी चौथ्या दिवशी संयमी फलंदाजी केली. दोन पूर्ण सत्रे त्यांनी कोणताही धोका न पत्करता पूर्ण केली. आता पाचव्या दिवसाच्या खेळात पहिला तास महत्त्वाचा आहे. त्यामुळे गिल-राहुल जोडीच्या फलंदाजीवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

मँचेस्टर कसोटीत हवामानाने फारसा अडथळा निर्माण केलेला नाही, पण बीसीसीच्या अहवालानुसार, मँचेस्टरमध्ये पावसाची ३० टक्के शक्यता आहे. भारतासाठी पाऊस फायदेशीर ठरू शकतो. पण वातावरण ढगाळ राहिले, तर चेंडू अधिक स्विंग होतो.

दुखापतीशी झुंजणारा ऋषभ पंत पाचव्या दिवशी फलंदाजीसाठी उपलब्ध असेल. जर पंत फलंदाजीला आला तर त्याचा उत्साह आणि आक्रमकता संघाचे मनोबल वाढवू शकते. जर भारताला सामना वाचवण्याची गरज भासली तर पंतला मैदानात उतरावे लागेल.

भारताने फलंदाजीत खोली आणण्यासाठी कुलदीप यादवसारख्या गोलंदाजाला सामन्याबाहेर ठेवले आहे. रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूरसारखे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. परिस्थिती बिकट झाल्यास त्यांना फलंदाजीचे कौशल्य दाखवावे लागेल.

सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची तंदुरूस्ती. स्नायूंना ताण आल्याने तो चौथ्या दिवशी गोलंदाजी करू शकला नाही. जर त्याने पाचव्या दिवशीही गोलंदाजी केली नाही तर भारतासाठी फायद्याचेच ठरेल. पण शेवटच्या सत्रात तो गोलंदाजीला आला तर सामन्याचा निकाल बदलू शकतो.