भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यालाएका सामन्याच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावं लागू शकतं. असं झाल्यास त्याला तिसऱ्या कसोटीला मुकावे लागू शकते.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विराटनं अम्पायर नितीन मेनन यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यानं मैदानावर हुज्जतही घातली.
अक्षर पटेलनं इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्ली ( ३) व नाइट वॉचमन जॅक लिच ( ०) यांना माघारी पाठवले. अश्विननं दुसरा सलामीवीर रोरी बर्न्स ( २५) याचा अडथळा दूर केला आणि टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं.
अक्षर पटेलनं तिसऱ्या दिवसाचं अखेरचं षटक टाकलं आणि त्यात पहिल्याच चेंडूवर रूट पायचीत असल्याची अपील झाली. मैदानावरील पंच नितीन मेनन यांनी रूटला नाबाद देताच कोहलीनं DRS घेतला.
नितीन मेनन यांनी इंग्लंडचा फलंदाज जो रूट याला पायचीत नाबाद दिले होते, त्यानंतर विराटनं DRS घेतला. त्यात रूट पायचीत असल्याचे स्पष्ट दिसत होते, परंतु तिसऱ्या पंचांनी अम्पायर्स कॉल दिल्यानं रूटला जीवदान मिळालं.
या निर्णयावर विराट संतापला आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही नाराजी व्यक्त केली. अम्पायरशी हुज्जत घालणे विराटला महागात पडू शकतं आणि नियमानुसार त्याच्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई होऊ शकते.
आयसीसीच्या नियमानुसार कलम २.८ अंतर्गत विराटवर कारवाई होऊ शकते. अम्पायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना त्यांच्याशी हुज्जत घालणे, हा नियामुसार गुन्हा आहे.
त्यामुळे आता विराटवर लेव्हल १ किंवा लेव्हल २ चा चार्ज लागू शकतो आणि त्याला एक ते ४ डिमेरिट्स गुण दिले जाऊ शकतात. भारतीय कर्णधाराच्या खात्यात आधीच २ डिमेरिट्स गुण आहेत.
२४ महिन्यांत चार डिमेरिट्स गुण झाल्यास खेळाडूला १ कसोटी/ २ वन डे किंवा ट्वेंटी-20 सामन्यांच्या बंदीचा सामान करावा लागू शकतो.
भारतानं दुसऱ्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडसमोर ४८२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे आणि तिसऱ्या दिवशीच इंग्लंडचे तीन फलंदाज माघारी परतले आहेत. चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात आर अश्विननं इंग्लंडला आणखी एख धक्का दिला.