पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी

IND Vs ENG 1st test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत याने दोन्ही डावांत शतकी खेळी करत मोठा पराक्रम गाजवला आहे. पहिल्या डावात १३४ धावांची खेळी करणाऱ्या पंतने दुसऱ्या डावात ११८ धावा फटकावल्या. रिषभ पंतने या दोन्ही खेळी दरम्यान, काही जुने विक्रम मोडीत काढताना अनेक नवे विक्रम रचले. या विक्रमांचा आढावा खालील प्रमाणे...

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत याने दोन्ही डावांत शतकी खेळी करत मोठा पराक्रम गाजवला आहे. पहिल्या डावात १३४ धावांची खेळी करणाऱ्या पंतने दुसऱ्या डावात ११८ धावा फटकावल्या. रिषभ पंतने या दोन्ही खेळी दरम्यान, काही जुने विक्रम मोडीत काढताना अनेक नवे विक्रम रचले. या विक्रमांचा आढावा खालील प्रमाणे...

रिषभ पंत याचे ४४ कसोटी सामन्यांमधील हे आठवे शतक आहे. त्याने ७७ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्याशिवाय पंतने १५ अर्धशतकेही ठोकली असून, कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३ हजार २०० धावा काढल्या आहेत.

इंग्लंडमध्ये कसोटीच्या दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा रिषभ पंत हा भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात कुठल्याही भारतीय क्रिकेटपटूला अशी कामगिरी करता आली नव्हती.

त्याबरोबरच एका कसोटीच्या दोन्ही डावात शतकी खेळी करणारा रिषभ पंत हा अँडी फ्लॉवरनंतरचा दुसरा यष्टीरक्षक ठरला आहे. अँडी फ्लॉवर याने २००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या हरारे कसोटीत १४२ आणि १९९ धावांची खेळी करत असा पराक्रम केला होता.

रिषभ पंत हा कसोटीच्या दोन्ही डावांत शतक फटकावणारा सातवा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याशिवाय इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा तो एकमेव आशियाई फलंदाज ठरला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये रिषभ पंतने दोन्ही डावांत मिळून २५२ (१३४ आणि ११८) धावा फटकावल्या आहेत. या कुठल्याही यष्टीरक्षकाने एका कसोटीत काढललेल्या चौथ्या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. तर भारताकडून याआधी यष्टीरक्षकाने एका कसोटी काढलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम बुधी कुंदरन यांच्या नावे होता. त्या्ंनी १९६४ मध्ये इंग्लंडविरुद्ध चेन्नईमध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात २३० (१९२ आणि ३८) धावा फटकावल्या होत्या.

रिषभ पंत याने आतापर्यंत इंग्लंडमध्ये ४ शतकं ठोकली आहेत. कुठल्याही यष्टीरक्षकाने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात फटकावलेली ही सर्वाधिक शतकं आहेत. याआधी वेस्ट इंडिजमध्ये इंग्लंडच्या लेस एम्स आणि भारतामध्ये झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर यांनी प्रत्येकी ३ शतकं ठोकली होती. त्याबरोबरच रिषभ पंत हा आता इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत अॅलेक स्टीवर्ट आणि मॅट प्रायरसोबत संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

रिषभ पंत याने या कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून ९ (६ आणि ३) षटकार ठोकले. इंग्लंडमध्ये एका कसोटीत कुठल्याही फलंदाजाने ठोकलेले हे संयुक्तरीत्या सर्वाधिक षटकार आहेत. याआधी अँड्र्यू फ्लिंटॉफने २००५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एजबेस्टन कसोटीत आणि बेन स्टोक्सने २०२३ साली झालेल्या लॉर्ड्स कसोटीत ९ षटकार ठोकले होते.

या कसोटीत रिषभ पंत याने इंग्लंडचा फिरकीपटून शोएब बशीरच्या गोलंदाजीवर ७ षटकार ठोकले. याबरोबरच कसोटीमध्ये कुठल्याही एकाच गोलंदाजाविरोधात सर्वाधिक ७ षटकार ठोकरणारा रिषभ पंत हा संयुक्तरीत्या तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी वासिम अक्रमने पॉल स्ट्राँग (शेखूपुरा कसोटी, १९९६) याच्या गोलंदाजीवर नऊ, रोहिल शर्माने डेन पीट (विशाखापट्टणम कसोटी, २०१९) याच्या गोलंदाजीवर आठ, तर हॅरी ब्रुक याने जाहिद महमूद (२०२२, रावळपिंडी कसोटी) याच्या गोलंदाजीवर ७ षटकार ठोकले होते.

त्याबरोबरच रिषभ पंत याने इंग्लंडमधील आपल्या मागच्या पाच कसोटी डावांमध्ये प्रत्येक डावात पन्नासहून अधिक धावा काढल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो सातवा पाहुणा फलंदाज ठरला आहे.

रिषभ पंत याने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत पाच शतकं फटकावली आहेत. त्याबरोबरच पंत हा कुठल्याही संघाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे.