Rohit Sharma, IND vs ENG 1st ODI Live Updates : १२ चेंडूंत ५८ धावा! रोहित शर्माचा वन डेत मोठा विक्रम; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

India vs England 1st ODI Live Updates : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात १० विकेट्स राखून विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

India vs England 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) आज इंग्लंडच्या संघाला मुळापासून हादरवून सोडले. पहिल्याच स्पेलमध्ये ५ षटकांत ४ विकेट्स घेत बुमराहने भारताला मजबूत पकड मिळवून दिली. त्यानंतर मोहम्मद शमीने पुढची जबाबदारी चोख पार पाडली.

बुमराहने १९ धावांत ६ विकेट्स घेताना इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा भारतीचा विक्रम नोंदवला. भारताने १११ धावांचे लक्ष्य सहज पार केले. रोहित शर्मा व शिखर धवन या अनुभवी जोडीने विक्रमांना गवसणी घालताना भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने हा सामना १० विकेट्स व १८८ चेंडू राखून जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात रोहितने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

भारतीय गोलंदाजांच्या अविश्वसनीय कामगिरीनंतर रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीने इंग्लंडला झोडून काढले. सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली या दोघांनंतर वन डेत सलामीला ५०६६* धावा करणारी ही दुसरी भारतीय जोडी ठरली. सौरव गांगुली-सचिन तेंडुलकर यांनी ६६०९ धावा, अॅडम गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन यांनी ५३७२ धावा, गॉर्डन ग्रिनीज-डी हायनेस यांनी ५१५० धावा केल्या आहेत. रोहितने वन डेतील ४५ वे अर्धशतक पूर्ण करताना चांगली फटकेबाजी केली. शिखरने त्याला उत्तम साथ दिली. रोहित-धवन या जोडीने १८.४ षटकांत हा सामना संपवला.

रोहितने ५८ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७६ धावा केल्या, तर धवनने ३१ धावा करताना भारताला १० विकेट्स व १८८ चेंडू राखून विजय मिळवून दिला. भारताचा हा चेंडूंच्या बाबतीत तिसरा मोठा विजय ठरला. यापूर्वी २००१मध्ये केनियाविरुद्ध २३१ चेंडू व २०१८मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २११ चेंडू राखून भारताने विजय मिळवला होता. परदेशातील हा भारताचा ( चेंडू राखून) सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी २०१८मध्ये सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेवर १७७ चेंडू राखून विजय मिळवला होता.

भारताने पहिल्यांदाच इंग्लंडवर १० विकेट्स राखून विजय मिळवला आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील १४ सामन्यांतील हा १२वा विजय ठरला. रोहित व धवन यांनी वन डेत १८ वेळा शतकी भागीदारी केली आहे.

या सामन्यात रोहितने ५ षटकार खेचून एक मोठा विक्रम केला. वन डे क्रिकेटमध्ये त्याने २५० षटकार पूर्ण केले आणि हा टप्पा ओलांडणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. शाहिद आफ्रिदी ( ३५१), ख्रिस गेल ( ३३१), सनथ जयसूर्या ( २७०) यांच्यानंतर रोहितचा ( २५०) क्रमांक येतो. महेंद्रसिंग धोनी २२९ षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहे.