IND vs BAN, 3rd ODI : ८ सामन्यांत ५२४ धावा, तरीही टीम इंडियाला महाराष्ट्राचा फलंदाज नकोसा; चार देश फिरवून बाकावरच बसवले

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: भारताच्या संघात रोहित शर्मा व दीपक चहर यांच्याजागी कुलदीप यादव व इशान किशन यांना संधी मिळाली आहे.

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: पहिल्या दोन सामन्यांत हार झाल्याने भारताने मालिका गमवाली आहे आणि आज अखेरच्या सामन्यात त्यांना उरलेली इभ्रत वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. रोहित शर्मा, दीपक चहर व कुलदीप सेन यांनी दुखापतीमुळे दुसऱ्या वन डे नंतर मालिकेतूनच माघार घेतली आहे.

लिटन दासने सलग तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या संघात आज दोन बदल पाहायला मिळत आहेत. भारताच्या संघात रोहित शर्मा व दीपक चहर यांच्याजागी कुलदीप यादव व इशान किशन यांना संधी मिळाली आहे.

इशान किशनच्या एन्ट्रीने राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) ला चार देशांत केवळ प्रवास करूनच माघारी परतावे लागणार आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२२ मध्ये राहुलने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ८ सामन्यांत ८७.३३ च्या सरासरीने ५२४ धावा केल्या आहेत. त्यात ३ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे.

राहुल त्रिपाठी हा आयर्लंड ( २ ट्वेंटी-२० सामने), झिम्बाब्वे ( ३ वन डे सामने), दक्षिण आफ्रिका ( ३ वन डे सामने) आणि बांगलादेश ( ३ वन डे सामने) दौऱ्यातील संघाचा सदस्य होता, परंतु त्याला बाकावर बसवून ठेवण्यातच संघ व्यवस्थापनाने धन्यता मानली.

आयर्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर संधी न मिळालेल्या राहुलला बांगलादेशविरुद्ध खेळायला मिळेल अशी अपेक्षा होती. पम, रोहितच्या दुखापतीनंतरही त्याला बाकावरच बसवून ठेवले गेले. आयपीएलच्या प्रत्येक पर्वात राहुलने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे शिवाय स्थानिक स्पर्धाही तो गाजवतोय.

राहुलने प्रथम क्षेणी क्रिकेटमध्ये ४९ सामन्यांत २६५६ धावा, लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५३ सामन्यांत १७८२ धावा आणि १२५ ट्वेंटी-२० सामन्यांत २८०१ धावा केल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर २९ विकेट्सही आहेत.