IND vs AUS: "त्यानं दोन्ही डावात फक्त 64 धावा केल्या पण...", गौतम गंभीरकडून 'विराट' कौतुक

gautam gambhir on virat kohli: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

खरं तर पहिल्या दोन्हीही सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. दोन्हीही सामन्यात फिरकीपटू गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. संघ अडचणीत असताना विराटने केलेल्या खेळीमुळे भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर प्रभावित झाला आहे.

विराट कोहलीने आपल्या फलंदाजीत दाखवलेले नियंत्रण कौतुकास्पद असल्याचे गंभीरने म्हटले आहे. विराट कोहलीने दिल्ली कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 44 तर दुसऱ्या डावात 20 धावा केल्या.

यादरम्यान त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. लक्षणीय बाब म्हणजे आता विराट कोहली 25000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा जगातील सहावा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि जॅक कॅलिस यांनी ही कामगिरी केली होती.

याशिवाय ही कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. कोहलीने केवळ 549 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या धावा केल्या आणि सर्वात जलद 25000 धावा करणारा फलंदाज बनला.

गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले, "विराट कोहलीने पहिल्या डावात ज्या प्रकारचे नियंत्रण दाखवले ते विलक्षण होते. या कसोटी सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली. दोन्ही डावात त्याने केवळ 60-65 धावा केल्या असल्या तरी त्याची फलंदाजी उत्कृष्ट होती. मी याआधीही म्हटले होते की जेव्हा तुम्ही धावा करता तेव्हा त्यातून तुम्हाला मिळणारा आत्मविश्वास ही वेगळी बाब असते."

तसेच मोठ्या कालावधीपासून खेळणारा खेळाडू कोणत्या प्रकारची फलंदाजी करतो हे खूप महत्त्वाचे ठरते. कोहलीने या लयीत फलंदाजी केली तर आगामी सामन्यांमध्येही तो धावा करेल, असे गौतम गंभीरने अधिक म्हटले.

भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात 6 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 10 बळी घेतले, तर रविंचद्रन अश्विनला 6 बळी घेण्यात यश आले.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.