IND vs AUS 4th Test : रोहित शर्माने अहमदाबाद कसोटीत 'या' तीन खेळाडूंना न खेळवल्यास WTC Finalचं स्वप्न विसरा!

India vs Australia, 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक केले. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने तिसरी कसोटी ९ विकेटने जिंकली आणि पिछाडी १-२ अशी कमी केली.

या मालिकेचा शेवटचा सामना अहमदाबादमध्ये ९ मार्चपासून खेळवला जाणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण, हा सामना जिंकून भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC final) फायनलचं तिकीट मिळणार आहे.

ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील त्यांचं स्थान पक्के केले आहे. त्यामुळे भारत व श्रीलंका यांच्यात एका स्थानासाठी चुरस आहे आणि भारताला अहमदाबाद कसोटी जिंकावीच लागणार आहे. त्यासाठी रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनची योग्य निवड करणे गरजेचे आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केल्यानंतर मोहम्मद शमीला इंदूर कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला. उमेशने चांगली कामगिरी केली, परंतु शमी असता तर त्या कसोटीचे चित्रं कदाचीत वेगळं पाहायला मिळालं असतं.

चौथ्या आणि निर्णायक सामन्यात मोहम्मद शमीला संघात परत आणता येईल. शमीने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भारताला अनेक वेळा हातातून निसटलेले सामने जिंकून दिले आहेत. त्याच्यासाठी मोहम्मद सिराजला बाहेर बसवले जाऊ शकते. शमीने या मालिकेत ७ विकेट्स घेतल्या आहेत.

रोहितने वर्क लोड करण्यासाठी शमीला संघातून वगळले आणि उमेश यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली.याचा फायदा उठवण्यात उमेश पूर्णपणे यशस्वी ठरला. त्याने पहिल्या डावात आपल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांची तारांबळ उडवली. त्याने स्टंप टू स्टंप टाकून खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.

उमेश यादवच्या गोलंदाजीने चाहत्यांसह संघ व्यवस्थापनही चांगलेच प्रभावित झाले होते. उमेश यादवला चौथ्या सामन्यातून वगळण्याचा निर्णय अजिबात योग्य ठरणार नाही. त्यामुळेच भारतीय खेळपट्टींवर प्रभावी मारा करणारा उमेश अहमदाबाद कसोटी सामन्यात खेळताना दिसू शकतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये केएस भरतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. मात्र त्याला प्रभावी कामगिरी करण्यात करता आली नाही. त्यामुळे त्याचे अहमदाबादमध्ये होणाऱ्या चौथ्या सामन्यात खेळणे कठीण आहे. या निर्णायक आणि महत्त्वाच्या कसोटी सामन्यासाठी इशान किशनचा विचार केला जाऊ शकतो.