Virat Kohli Records, IND vs AUS: विराट कोहलीचा 'दिल्ली स्पेशल' प्लॅन! ११८१ दिवसांत जे घडलं नाही ते आता होणार?

दिल्लीत म्हणजेच विराटच्या घरच्या मैदानावर रंगणार दुसरी कसोटी

Virat Kohli Records, IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी दिल्लीत खेळवली जाणार आहे. पहिल्या कसोटीत भारताने फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर मोठा डाव टाकला. त्यांनी ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि १३२ धावांनी नमवून मालिकेत १-०ची आघाडी घेतली.

आता दुसरी कसोटी दिल्लीत म्हणजेच रनमशिन माजी कर्णधार विराट कोहली याच्या घरच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. जेव्हा विराट त्याच्या घरच्या मैदानावर खेळतो, तेव्हा त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणे स्वाभाविकच आहे.

दिल्लीत विराटने धावा कराव्यात आणि चाहत्यांना खुश करावे असे समस्त भारतीयांनाच वाटते. विराट कोहलीच्या बॅटने धावा काढल्या जातील, ही बाब समजून घेण्यासारखी आहेच. पण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की- १,१८१ दिवसांचं हे गणित नक्की काय आहे? चला तर मग... जाणून घेऊया.

विराट कोहलीने गेल्या १,१८१ दिवसांत २१ कसोटी सामन्यांमध्ये ३७ डाव खेळले आहेत. यात त्याने २५.८० च्या माफक सरासरीने ९२९ धावा केल्या आहेत. या धावांमध्ये ६ अर्धशतकांचाही समावेश आहे.

गेल्या ३७ कसोटी डावांमध्ये अद्याप शतक झळकावण्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहलीच्या या कामगिरीमुळे त्याच्या एकूण कसोटी कारकिर्दीतील फलंदाजी सरासरीवरही परिणाम झाला आहे. असून तो ७५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. विराटची सध्याची कसोटीतील फलंदाजीची सरासरी ४८.६८ आहे.

त्या १,१८१ दिवसांच्या गणिताचा विराटच्या शतकाशी संबंध आहे. विराटने गेल्या १,१८१ दिवसांत कसोटीत चांगली कामगिरी केली असली तरी त्याला अद्यापही शतकाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ३८व्या कसोटी डावात विराटची ही प्रतीक्षा संपावी अशी तमाम क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.