भारतीय संघाने पहिल्या कसोटीत एक डाव व १३२ धावांनी विजय मिळवताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील १७७ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४०० धावांचा डोंगर उभा केला.
भारताच्या २२३ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात ९१ धावा करता आल्या. आर अश्विनने ३७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली. पहिल्या डावात पाच विकेट्स घेणाऱ्या जडेजाने फलंदाजीतही ७० धावांचे योगदान दिले.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १७७ धावाच करता आल्या. मार्नस लाबुशेन ( ४९), स्टीव्ह स्मिथ ( ३७), अॅलेक्स केरी ( ३६) व पीटर हँड्सकोम्ब ( ३१) यांनी चांगली फलंदाजी केली. भारताकडून रवींद्र जडेजाने ४७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. आर अश्विन ( ३-४२), मोहम्मद शमी ( १-१८) व मोहम्मद सिराज ( १-३०) यांनी चांगली गोलंदाजी केली.
रोहित शर्माच्या १२० धावांनंतर रवींद्र जडेजा ( ७०) आणि अक्षर पटेल ( ८४) यांनी भारताला ४०० धावांचा टप्पा गाठून दिला. जडेजा व पटेल यांनी आठव्या विकेटसाठी २११ चेंडूंत ८८ धावा जोडल्या. मोहम्मद शमीने ( ३७) नवव्या विकेटसाठी पटेलसह ५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अक्षर पटेल १७४ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ८४ धावांवर बाद झाला. भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर टॉड मर्फीने १२४ धावा देताना ७ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ९१ धावांवर गडगडला. आर अश्विनने ३७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. रोहित शर्मा म्हणाला,' शतकाचा आनंद आहेच. बर्याच गोष्टींचा विचार करता हे विशेष शतक होते. मालिकेची सुरुवात, चॅम्पियनशिप टेबलमध्ये आम्ही कोठे उभे आहोत हे खूप महत्वाचे आहे, आमच्यासाठी चांगली सुरुवात करणे महत्वाचे आहे. आम्हाला माहित आहे की अशा मालिका खेळणे महत्वाचे आहे. चांगली सुरुवात केल्याचा आनंद झाला. मी अशी कामगिरी करू शकलो ज्यामुळे संघाला मदत मिळाली.''
''मी दुर्दैवी होतो की मला काही कसोटी सामने मुकावे लागले, पण परत आल्याने आनंद झाला. कर्णधारपदी नियुक्ती झाल्यापासून मी फक्त दोनच कसोटी खेळलो. इंग्लंडमध्ये कोविड झाला, दक्षिण आफ्रिकेमधील तीन सामन्यांना मुकलो, बांगलादेशमध्ये विचित्र दुखापत झाली. तुम्ही बराच काळ खेळता तेव्हा अशा गोष्टी घडू शकतात, परंतु मला यापूर्वी दुखापती झाल्या आहेत त्यामुळे त्यांच्यापासून कसे परत यायचे हे मला माहित्येय,''असे रोहित म्हणाला.
त्याने पुढे म्हटले की,''मी ओपनिंग सुरू केल्यापासून मी माझ्या खेळण्याच्या पद्धतीत बदल केला. मी मुंबईत वाढलो आणि तेथील खेळपट्टी फिरकींना मदत करणाऱ्या होत्या. त्यामुळे फुटवर्कची गरज आहे. त्याच वेळी गोलंदाजांवर दबाव आणायला हवा. तुम्हाला काहीतरी वेगळे करावे लागेल. सीमर्सची पहिली दोन षटके महत्त्वाची होती. विरोधी पक्ष नेहमीच दबावाखाली असतो कारण आम्हाला माहित आहे की आम्ही फिरकी विभागात गुणवत्ता आहे.''