IND vs AFG: हार्दिकला शिवम दुबे टक्कर देणार? धोनीच्या 'युवराज'ला करून दाखवण्याची सुवर्णसंधी

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे.

नवीन वर्षातील पहिली मालिका आणि भारतीय संघाची विजयी सलामी... भारत दौऱ्यावर आलेल्या अफगाणिस्तानला पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. शिवम दुबेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमानांनी सामना एकतर्फी केला.

पहिल्या सामन्यातील विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर शुबमन गिलने डाव सांभाळला पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघ अडचणीत असताना शिवम दुबेने खेळपट्टीवर पाऊल ठेवले अन् निर्णायक भूमिका बजावली.

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ४० चेंडूत ६० धावा करणाऱ्या शिवम दुबेने आपल्या खेळीचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला दिले. तर दुसरीकडे सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे.

भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगसारखी फलंदाजी करणारा शिवम हा मर्यादित षटकांमध्ये हार्दिक पांड्यासारखा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे, असे चाहत्यांचे मत आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग असलेल्या शिवम दुबेने ६० धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय गोलंदाजी करताना त्याला एक बळी घेण्यात यश आले. त्याने २ षटके टाकली आणि फक्त ९ धावा दिल्या.

शिवम दुबेने युवराजच्या शैलीत मिडविकेटवर षटकार मारला आणि सरळ सीमारेषेबाहेर करिष्माई शॉट देखील खेळला. आगामी काळात ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे, त्या दृष्टीने भारतीय चाहत्यांना हा सुखद धक्का असल्याचे दिसते.

हार्दिक पांड्याची दुखापत पाहता शिवम दुबे त्याला पर्याय म्हणून पुढे येतो का हे पाहण्याजोगे असेल. त्यासाठी त्याला उरलेले दोन सामने आणि आयपीएलच्या संपूर्ण हंगामात प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे.

दुबेच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर भारताने ६ गडी राखून विजय मिळवला. या खेळीसह तो सामनावीरही ठरला. त्याने सामन्यानंतर सांगितले की, जेव्हा मी फलंदाजीला आलो तेव्हा मी धोनी ज्या पद्धतीने सामन्याचा शेवट करायचा त्याचा विचार करत होते. त्याने मला वेगवेगळ्या परिस्थितीत कसे खेळायचे हे शिकवले आणि मला दोन-तीन टिप्स दिल्या आहेत.

तसेच जर माही भाईने असेच मार्गदर्शन कायम ठेवले तर मी चांगला खेळत राहीन. त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे, असेही त्याने सांगितले. त्यामुळे धोनीचा 'युवराज' हार्दिक पांड्याला टक्कर देणार का हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

मागील वर्षी पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शिवम दुबे भारतीय संघाचा भाग होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या ट्वेंटी-२० मालिकेत तो भारतीय संघाचा भाग होता पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.