धोनी, विराटचा विक्रम रोहित मोडणार? हिटमॅनला एका दगडात दोन पक्षी मारण्याची सुवर्णसंधी

IND vs AFG T20 Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ जानेवारीपासून ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे.

सर्वांच्या लाडक्या हिटमॅनची भारताच्या ट्वेंटी-२० संघात एन्ट्री झाली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा तब्बल १४ महिन्यांनंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये दिसतील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ जानेवारीपासून ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ भारतात आला आहे. आगामी मालिकेतून दोन मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्याची सुवर्णसंधी रोहितकडे आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांचे विक्रम मोडण्याचे आव्हान किंबहुना संधी भारताच्या विद्यमान कर्णधाराकडे आहे. भारताने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर कसोटी मालिका खेळली.

अफगाणिस्तानने यूएईला पराभूत करून भारताला आव्हान देण्याच्या इराद्याने भारतीय भूमीवर पाऊल ठेवले. भारताने जर अफगाणिस्तानचा ३-० ने पराभव केल्यास रोहित भारताच्या ट्वेंटी-२० इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार बनेल.

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत ५१ ट्वेंटी-२० सामन्यांपैकी ३९ सामने जिंकले आहेत, तर धोनीच्या नेतृत्वात ७२ पैकी ४१ सामने जिंकण्यात भारताला यश आले.

त्यामुळे भारतीय संघाने अफगाणिस्तानचा दारूण पराभव केल्यास रोहित माहीला या यादीत मागे टाकेल अन् ट्वेंटी-२० मधील सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार बनेल.

ट्वेंटी-२० मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराट कोहलीचे वर्चस्व आहे. विराट कोहली ५० सामन्यांत १५७० धावा करून अव्वल स्थानावर आहे, तर रोहित शर्मा ५१ सामन्यांत १५२७ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान, आगामी मालिकेत ४४ धावा करताच रोहित शर्मा ट्वेंटी-२० मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू बनेल. भारत आणि अफगाणिस्तान या मालिकेतील दुसरा सामना रोहितचा १५० वा ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना असेल. खरं तर ही किमया साधणारा रोहित पहिला पुरूष क्रिकेटर ठरेल. त्याने आतापर्यंत १४८ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली. तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमतुल्लाह गुरबाज, हशमतुल्लाह झाझाई, इब्राहिम अलिखिल, रहमत शाह, मोहम्मद नबी, एन. झादरान, के. जनात, ए. ओमरजाई, एस. अश्रफ, एम. रहमान, एफ. फारुखी, एफ. मलिक, नवीन उल हक, एन. अहमद, एम. सालेम, क्यू अहमद, गुलबदीन नईब, राशिद खान.