पत्नीकडून धोका, तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न; कौटुंबिक कलह पण शमीचे जोरदार पुनरागमन

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या घातक गोलंदाजीने फलंदाजांना घाम फोडत आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या घातक गोलंदाजीने फलंदाजांना घाम फोडत आहे. वन डे विश्वचषक २०२३ मध्ये त्याने आतापर्यंत केवळ तीन सामने खेळले असून १४ बळी पटकावले आहेत.

हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला अन् शमीला संधी मिळाली, ज्याचा पुरेपुर फायदा उठवण्यात त्याला यश आले. मूळचा उत्तर प्रदेशातील असलेल्या शमीचा इथपर्यंत प्रवास खूप चढ उताराचा राहिला.

कौटुंबिक कलह, वाद यामुळे त्रस्त झालेल्या शमीने तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, ज्याचा खुलासा खुद्द शमीने केला होता.

खरं तर शमीला त्याची पत्नी हसीन जहॉंमुळे विविध समस्यांचा सामना करावा लागला. पत्नीसोबतच्या वादामुळे तो मानसिक तणावात होता. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून वाद अद्याप कायम आहे. याच कारणामुळे भारतीय खेळाडूच्या मनात टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार आला होता.

वयाच्या १७व्या वर्षी मोहम्मद शमीने १९ वर्षाखालील संघासाठी ट्रायल दिली होती. पण तेव्हा त्याची निवड झाली नव्हती. यानंतर शमीचे प्रशिक्षक बदरूद्दीन यांना कोलकातावरून एक फोन आला अन् तिथूनच शमीला 'क्रिकेट'मय प्रवास सुरू झाला.

कोलकात्याच्या अलीपूर जिल्हा न्यायालयाने शमीला अंतरिम देखभाल म्हणून पत्नी हसीन जहाँला दरमहा ५०,००० रुपये देण्याचे निर्देश दिले होते.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यात मागील पाच वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे. २०१८ मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर मारहाण केल्याचा आरोप केला होता.

मोहम्मद शमीला पहिल्या चार सामन्यांमध्ये संधी मिळाली नव्हती. पण हार्दिकच्या दुखापतीने शमीचा प्लेइंग इलेव्हनमधील मार्ग मोकळा झाला. पांड्या संघाबाहेर झाल्यानंतर शार्दुल ठाकूरला वगळण्यात आले आणि त्या दोघांच्या जागी शमी आणि सूर्यकुमार यादवला संधी मिळाली.

गुरूवारी श्रीलंकेला ३०२ धावांनी पराभूत करून भारताने चालू विश्वचषकात सलग सातवा विजय मिळवला. चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय मिळवून विजयी सलामी दिल्यानंतर विजयाचा षटकारही मारण्यात टीम इंडियाला यश आले.

भारत आपल्या आगामी सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडेल, तर साखळी फेरीतील अखेरचा सामना नेदरलॅंड्सशी होईल.