IND vs AUS: "जर भारतात धावा केल्या नाही तर टीका होतेच", केएल राहुलला गांगुलीने दिला मोलाचा सल्ला

Sourav Ganguly on KL Rahul: सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.

सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

खरं तर पहिल्या दोन्हीही सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. दोन्हीही सामन्यात फिरकीपटू गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. मात्र, भारतीय फलंदाजांना साजेशी फलंदाजी करता आली नाही.

सलामीवीर लोकेश राहुलवर खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टीका होत आहे. भारताचा माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद आणि समालोचक आकाश चोप्रा यांच्यात तर राहुलच्या फॉर्मववरून वाद रंगला आहे. त्यामुळे आगामी तिसऱ्या सामन्यात राहुलच्या खेळीकडे विशेष लक्ष असणार आहे.

मात्र, तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठे विधान केले आहे. भारतात खेळताना धावा केल्या नाहीत तर टीका होतेच असे गांगुलींनी म्हटले आहे.

पीटीआय या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना गांगुलींनी म्हटले, "लोकेश राहुलकडून सर्वांना खूप अपेक्षा आहेत. मात्र, तो सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. साहजिकच खराब प्रदर्शनामुळे टीका टाळणे त्याला कठीण होईल."

दरम्यान, जेव्हा तुम्ही भारतात धावा करत नाही, तेव्हा टीका होतच असते. राहुल एकमेव असा खेळाडू नाही. याआधी देखील अनेकांनी या गोष्टींचा सामना केला आहे, असेही गांगुलींनी सांगितले.

वन डे मालिकेबद्दल गांगुलींनी म्हटले, "खेळाडूंवर खूप दडपण असून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. संघ व्यवस्थापनाला वाटते की राहुल संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. पण प्रशिक्षक आणि कर्णधाराला काय वाटते ते महत्त्वाचे आहे."

"तुम्ही धावा करण्यात अपयशी झाला तर टीका होणारच... पण मला खात्री आहे की राहुलकडे क्षमता आहे. पण जेव्हा त्याला अधिक संधी मिळतील तेव्हा अधिक चांगली खेळी करावी लागेल", असा सल्ला गांगुलींनी यावेळी दिला.

लोकेश राहुल सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्याच्या शेवटच्या कसोटी शतकानंतर लोकेश राहुलची सरासरी 15.90 आहे, ज्यामुळे संघ व्यवस्थापनासाठी त्याला पाठिंबा देणे आव्हानात्मक झाले आहे. भारतीय संघ 1 मार्चपासून इंदूर येथे तिसरा कसोटी सामना खेळणार आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.