ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 भारत वि. ऑस्ट्रेलिया : शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी पुन्हा एकदा भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. सुरुवातीला संयमी खेळ करून खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर गब्बर-हिटमॅन जोडीनं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना विक्रमाला गवसणी घातली. धवनने वन डे क्रिकेटमधील 28वे वैयक्तिक अर्धशतक झळकावले, तर रोहितनं षटकार खेचून कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला. रोहितनेही कारकिर्दीतील 42 वे अर्धशतक पूर्ण केले. चला तर मग या जोडीची कमाल वाचूया...
रोहितला मिळालेलं जीवदान, धवनला झालेली दुखापत यानंतर दोन्ही खेळाडूंनी सावध खेळ करताना ऑसी गोलंदाजांना हैराण केले. या दोघांनी वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक यशस्वी जोडीचा मान पटकावला. त्यांनी शतकी भागीदारी करताना गॉर्डन ग्रिनीज आमि डेस्मंड हायनेस यांचा 1152 धावांचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात यशस्वी भारतीय जोडीचा मानही त्यांनी पटकावला. सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर या जोडीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 827 धावा करता आल्या आहेत.
रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून सर्वाधिक षटकार खेचण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. त्याने महेंद्रसिंग धोनीचा 354 धावांचा विक्रम मोडला. या विक्रमात वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल 520 षटकारांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ शाहिद आफ्रिदी ( 476) आणि ब्रेंडन मॅकलम ( 398) यांचा क्रमांक येतो.
सर्वाधिक शतकी भागीदारी करण्याच्या विक्रमात गब्बर-हिटमॅन जोडीनं पाचवे स्थान पटकावलं. त्यांची ही 16वी शतकी भागीदारी आहे. या विक्रमात सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर ही जोडी 26 शतकी भागीदारीसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ दिलशान व कुमार संगकारा ( 20), अॅडम गिलख्रिस्ट व मॅथ्यू हेडन ( 16), विराट कोहली व रोहित ( 16) यांचा क्रमांक येतो.