भारतीय महिला संघात लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्माच्या जागी संधी मिळताच प्रतीका रावल हिने सातत्यपूर्ण कामगिरीसह आपली संघातील जागा पक्की केली आहे.
तुम्हाला माहितीये का? दिल्लीकर प्रतीका रावल हिने २०१९ मध्ये CBSE च्या बारावीच्या परीक्षेत तब्बल ९२.५ टक्के गुण मिळवले होते. तिने मानसशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण घेतलं आहे. एवढेच नाही तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बास्केटबॉल क्रीडा प्रकारातही तिने सुवर्ण पदक कमावले आहे.
इथं जाणून घेऊयात अभ्यासात एक नंबर असणारी बास्केटबॉलमधील गोल्ड मेडलिस्टर आणि प्रतीका टीम इंडियाची ओपनर बॅटर कशी झाली? त्यासंदर्भातील खास स्टोरी
१ सप्टेंबर २००० मध्ये प्रतीका रावलचा जन्म पश्चिम दिल्ली येथील पटेल नगरमध्ये टीव्ही केबलचा व्यवसाय करणाऱ्या एका कुटुंबियात झाला. तिचे वडील प्रदीप रावल हे या व्यवसायात कार्यरत असून त्याचबरोबर ते दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बीसीसीआय प्रमाणित लेव्हल-१ अंपायर देखील आहेत.
सुरुवातीच्या काळात क्रिकेटपेक्षा तिचा कल हा बास्केटबॉल खेळात होता. पण वडिलांना आपल्या लेकीनं क्रिकेटर व्हावे, असे वाटत होते. प्रतिका अनेकदा पंचगिरी करणाऱ्या वडिलांसोबत क्रिकेट सामन्यांसाठी जायची. यातून बास्केटबॉलमध्ये गोल्ड मेडलिस्ट मिळवणारी प्रतिका क्रिकेटच्या प्रेमात पडली.
आक्रमकता आणि संयमी खेळी यात कमालीचा समतोल राखत परफेक्ट टायमिंगसह फटकेबाजी करण्याची क्षमता ओळखून प्रशिक्षकांनी तिला ओपनरच्या रुपात खेळण्याचा सल्ला दिला. टीम इंडियात संधी मिळताच तिने सातत्यपूर्ण खेळी करत स्वत:ला सिद्ध केलं.
प्रदीप रावल यांनी आपल्या लेकीला दिल्ली येथील रोहतक रोड जिमखाना क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळवून दिला. प्रशिक्षक शर्वन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तिने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. याच अकादमीतून इशांत शर्मा आणि हर्षित राणा याच अकादमीत घडले. इथं प्रवेश घेणारी ती पहिली मुलगी होती.
भारतीय संघाकडून स्मृती मानधनाच्या साथीनं डावाला सुरुवात करताना पहिल्या ६ डावात सर्वाधिक धावा करण्याचा खास रेकॉर्ड सेट २५ वर्षीय बॅटर प्रतीकाच्या नावे आहे.
यंदाच्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत स्मृती-प्रतीका जोडीकडून टीम इंडियाला मोठी आस आहे. कारण सध्याच्या घडीला महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही जोडी सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करताना पाहायला मिळाले आहे.
२२ डिसेंबर २०२४ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण करणारी प्रतीका अद्याप कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधील एकही सामना खेळलेली नाही.