चौथ्या जागेसाठी न्यूझीलंडसह पाकिस्तान व अफगाणिस्तान हेही शर्यतीत होते. मात्र, आज न्यूझीलंडने बंगळुरूत श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान व अफगाणिस्तान यांना स्पर्धेबाहेर फेकलेच आहे. पण, तरीही पाकिस्तानसाठी एक संधी आहे, मात्र ती सोपी नाही.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आज तिखट मारा करून श्रीलंकेला १७१ धावांवर गुंडाळले. कुसल परेराने या वर्ल्ड कपमधील वेगवान ( २२ चेंडू) अर्धशतक झळकावताना २८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा चोपल्या. त्यानंतर श्रीलंकेच्या १०व्या जोडीने ८७ चेंडूंत ४३ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले.
महीशा तीक्षणा ( ३९*) आणि दिलशान मधुसंका ( १९) यांनी दहाव्या विकेटसाठी ही विक्रमी भागीदारी केली. ट्रेंट बोल्टने ३ विकेट्स घेतल्या. ल्युकी फर्ग्युसन, रचिन रवींद्र व मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात, डेव्हॉन कॉनवे ( ४५) व रचिन रवींद्र ( ४२) यांनी स्फोटक सुरुवात करून. त्यानंतर केन विलियम्सन ( १४) आणि डॅरील मिचेल यांनी २९ चेंडूंत ४२ धावा जोडताना सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला. मिचेलने ३१ चेंडूंत ४३ धावा चोपून सामना एकतर्फी केला आणि २३.२ षटकांत ५ बाद १७२ धावा करून विजय पक्का केला.
न्यूझीलंड ०.७४३ असा नेट रन रेट आणि १० गुणांसह चौथ्या स्थानावर मजबूत पाय रोवून उभे राहिले आहेत. पाकिस्तान ०.०३६ असा नेट रन रेट आहे आणि त्यांना शेवटच्या लढतीत इंग्लंडविरुद्ध २८७ धावांनी विजय मिळवावा लागेल किंवा २८४ चेंडू राखून बाजी मारावी लागेल. इंग्लंडने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यास पाकिस्तानचे आव्हान संपेल. पाकिस्तानने ४०० धावा केल्या आणि इंग्लंडला ११२ धावांवर गुंडाळले तरीही ते पात्र ठरतील