भारताने आज त्यांच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. ३ बाद २ अशी भारताची अवस्था पाहून चेन्नईतील स्टेडियमवर प्रेक्षकांची अवस्था बिकट झालेली. पण, विराट कोहली व लोकेश राहुल यांनी विक्रमी कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला.
रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. कुलदीप यादव ( २-४२), आर अश्विन ( १-३४), जसप्रीत बुमराह ( २-३५), हार्दिक पांड्या ( १-२८) आणि मोहम्मद सिराज ( १-२६) यांनी उत्तम मारा केला. डेव्हिड वॉर्नर ( ४१) आणि स्टीव्ह स्मिथ ( ४६) यांनी ६९ धावांची भागीदारी करून ऑसींचा डाव सावरला होता. मार्नस लाबुशेन ( २७) आणि मिचेल स्टार्क ( २८) यांनी हातभार लावला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९.३ षटकांत १९९ धावांत ऑल आऊट झाला.
इशान किशन, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर हे खाते न उघडताच माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद २ धावा अशी झाली होती. पण, विराट कोहली व लोकेश राहुल यांनी मॅच विनिंग भागीदारी केली. विराट-लोकेशने २१५ चेंडूंत १६५ धावा जोडून विराटने ११६ चेंडूंत ६ चौकारांसह ८५ धावा केल्या. लोकेशने ११५ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद ९७ धावा केल्या. भारताने ४१.२ षटकांत ४ बाद २०१ धावा केल्या.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतालिकेत न्यूझीलंड २.१४९ नेट रन रेटसह अव्वल, तर दक्षिण आफ्रिका २.०४० नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश अनुक्रमे १.६२० व १.४३८ नेट रन रेटसह तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.
भारतीय संघासमोर २०० धावांचे माफक लक्ष्य होते आणि ते त्यांनी ४१.२ षटकांत पूर्ण केले. त्यामुळे भारताला नेट रन रेट फार चांगला ठेवता आला नाही. ते ०.८८३ अशा नेट रन रेटने पाचव्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तान व बांगलादेश हे दोन्ही शेजारी भारताच्या पुढे आहेत.