भारताला १९८२च्या पराक्रमाच्या पुनरावृत्तीची संधी, अफगाणिस्तानने उभी केलीय विक्रमांची 'दही हंडी'!

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : अफगाणिस्तानने आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ८ बाद २७२ धावांचा डोंगर उभा केला आहे. ३ बाद ६३ अशी अफगाणिस्तानची अवस्था झाली होती, परंतु अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी ( ८०) आणि आझमतुल्लाह ओमारझाई ( ६२) यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला आणि विक्रमांचा पाऊस पाडला.

हशमतुल्लाह शाहिदी हा वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानकडून ८० धावा करणारा पहिला कर्णधार ठरला. अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये एकाच डावात दोन ५०+ धावा चौथ्यांदा झाल्या आहेत. शाहिदीने ८० आणि अझमतुल्लाह ओमारझाईने ६२ धावा केल्या.

अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कप स्पर्धेत हशमतुल्लाह शाहिदीने सर्वाधिक ३ वेळा ५०+ धावा केल्या आहेत. नजिबुल्लाह झाद्रान आणि समीउल्लाह शिनवारी यांनी प्रत्येकी २ वेळा अशी कामगिरी केलीय. वर्ल्ड कप स्पर्धेत शाहिदीची ८० धावांची खेळी ही अफगाणिस्तानकडून एखाद्या फलंदाजाने केलेली तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.

अफगाणिस्तानची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. २०१९मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध लीड्स येथे २८८ धावा केल्या होत्या. आज अफगाणिस्तानने २०१९मध्ये इंग्लंडविरुद्धचा ८ बाद २४७ धावांचा विक्रम मोडला.

नवी दिल्लीच्या स्टेडियमवर १९८२ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध २७८ धावांचे यशस्वी लक्ष्य पार केले होते आणि ही सर्वोत्तम कामगिरी होती. ही कामगिरी वगळता २४०+ धावांच्या लक्ष्याचा इथे एकदाच यशस्वी पाठलाग झाला आहे. १९९६च्या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेने भारताविरुद्ध २७२ धावांचे लक्ष्य पार केले होते.

दिल्लीच्या मैदानावर २०१३नंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ सहापैकी पाच सामने जिंकला आहेत. भारताने मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना ७ विकेट्स राखून मॅच जिंकली होती.

मोहम्मद सिराज हा आजच्या सामन्यात सर्वात महागडा गोलंदाज ठरला त्याने ९ षटकांत एकही विकेट न घेता ७६ धावा दिल्या. यापूर्वी २०१९मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात १० षटकांत ७६ धावा दिल्या होत्या.