WC FINAL : वर्ल्ड कपच्या फायनलचे ३० कोटी प्रेक्षक साक्षीदार; BCCI सचिव जय शहांनी मानले आभार

यजमान संघ अपराजित राहून अंतिम फेरीत पोहचला पण दुर्दैवाने भारताच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला नाही.

भारतात क्रिकेट म्हणजे जणू काही एक धर्मच... या धर्माचे कोट्यवधी भक्त आहेत, जे आपल्या भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी सदैव तयार असतात.

अलीकडेच भारतात वन डे विश्वचषक पार पडला. यजमान संघ अपराजित राहून अंतिम फेरीत पोहचला पण दुर्दैवाने भारताच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला नाही.

पण, आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी नेहमी तयार असलेल्या भारतीय प्रेक्षकांनी एक नवा इतिहास रचला.

अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला, जिथे १ लाख प्रेक्षकांनी मैदानात उपस्थिती दर्शवली होती.

तर, ३० कोटी लोकांनी क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना टीव्हीवर पाहिला. बीसीसीआय सचिव जय शहांनी ही माहिती दिली.

जय शहा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "३० कोटी प्रेक्षकांनी टीव्हीवर अंतिम सामना पाहिला. भारतीय दूरचित्रवाणी इतिहासातील कोणत्याही प्रकारचा हा सर्वात जास्त पाहिला जाणारा कार्यक्रम ठरला आहे. पीक टीव्ही कॉन्करन्सीनेही १३ कोटींचा ऐतिहासिक उच्चांक गाठला."

"पीक डिजिटल कॉन्करन्सी ५.९ कोटी एवढी होती, हा देखील एक जागतिक विक्रम झाला आहे. भारतीय चाहत्यांचे क्रिकेटबद्दल असलेले प्रेम आणि उत्कटता पाहून आम्ही पुन्हा एकदा भारावून गेलो... सर्वांचे आभार", अशा शब्दांत शहांनी प्रेक्षकांचे आभार मानले.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. कांगारूंनी या विजयासह सहाव्यांदा जग्गजेते होण्याचा मान पटकावला.