Join us  

वेस्ट इंडिजचा रोविंद्र रामनरीन कसा बनला भारताचा रॉबिन सिंग?; टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला परदेशी खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 10:17 AM

Open in App
1 / 12

भारतीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाचे महत्त्व पटवून देणारे दोन खेळाडू अजय जडेजा व रॉबिन सिंग... दक्षिण आफ्रिकेकडे जाँटी ऱ्होड्स होता, तर भारताकडे हे दोन स्टार होते. यांच्या हातून सहजासहजी चेंडू निसटायचाच नाही... त्यांचा वसा पुढे युवराज सिंग व मोहम्मद कैफ, सुरेश रैना व रवींद्र जडेजा असा चालत राहिला आहे.

2 / 12

फक्त क्षेत्ररक्षणातच नव्हे तर जडेजा व रॉबिन ही जोडी म्हणजे टीम इंडियाच्या विजयाची अखेरची होप... त्यात रॉबिन हा गोलंदाजीतही आपली कमाल दाखवायचा, त्यामुळे त्याच्या फॉलोअर्सची संख्या किंचितशी अधिक असायची.

3 / 12

कोलंबोत श्रीलंकेविरुद्ध झळकावलेले शतक असो किंवा ढाक्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केलेली धुलाई... रॉबिन खेळपट्टीवर असेपर्यंत टीम इंडियाच्या विजयाच्या आशा कायम असायच्या. 1 कसोटी व 136 वन डे सामन्यांत प्रतिनिधित्व करणाऱ्या रॉबिननं अनेक अफलातून झेल घेतलेत, रन आऊट्सही केलेत.

4 / 12

त्रिनिदाद अँड टोबॅगो येथील प्रिन्स टाऊन येथील रॉबिन सिंगचा जन्म. मुळचा वेस्ट इंडियन असलेला रॉबिन हा भारताच्या क्रिकेट इतिहासात एवढं मोठं नाव कमावेल याची कल्पनाही कुणी केली नसेल. 14 सप्टेंबर 1963 साली प्रिन्स टाऊन येथे त्याचा जन्म तिथून ते आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) चा फिल्डींग कोच असा त्याचा आजवरचा प्रवास.

5 / 12

11 मार्च 1989मध्ये त्यानं भारताच्या वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तगडी स्पर्धा असतानाही त्यानं अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या बळावर संघातील स्थान 12 वर्ष टिकवून ठेवलं. 136 वन डे सामन्यांत त्यानं 1 शतक व 9 अर्धशतकांसह 2336 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 22 शतकं व 33 अर्धशतकांसह 137 सामन्यांत 6997 धावा आहेत, तर 228 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 4057 धावा त्यानं केल्या आहेत.

6 / 12

त्याच्या वडिलांचे नाव रामनरीन आणि आईचे नाव सावित्री सिंग असे आहे. त्याचं आजोळ मुळचं अजमेरचं. वयाच्या 19व्या वर्षी तो मद्रास ( आत्ताची चेन्नई) येथे स्थलांतरीत झाला. मद्रास विद्यापीठातून त्यानं अर्थशास्त्राची मास्टर पदवी घेतली. सध्या तो चेन्नईत राहतो आणि त्याच्या पत्नीचं नाव सुजाता व मुलगा धनंजय असे आहे. त्याचे आई-वडील व भावंड आजही त्रिनिदाद अँड टोबॅगो येथेच राहतात.

7 / 12

त्याचे मुळ नाव रोविंद्र रामनरीन असे आहे आणि 1982-1983 या कालावधीत त्यानं त्रिनिदाद युवा क्रिकेट संघाचे नेतृत्वही सांभाळले होते. 1983मध्ये त्यानं दोन वन डे सामन्यांत त्रिनिदादच्या सीनियर संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. त्या सामन्यात त्याच्यासोबत फिल सिमन्स, डेव्हिड विलियम्स, लॅरी गोमेज, गस लॉगी, रँगी नयन, शेल्डन गोमेज व रिचर्ड गॅब्रीएल हेही खेळले होते.

8 / 12

एकदा हैदराबाद ब्लू ( Hyderabad Blue ) नावाचा संघ त्रिनिदाद दौऱ्यावर क्रिकेट स्पर्धेसाठी गेला होता. तेव्हा रॉबिन त्रिनिदाद संघाकडून खेळला आणि त्याच्या अष्टपैलू कामगिरीनं हैदराबाद ब्लू संघातील इब्राहिम नावाच्या व्यक्तिला प्रभावित केलं. त्यानं रॉबिनला मद्रासला येण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर रॉबिन मद्रासमध्ये आला अन् त्याच्या क्रिकेट कारकीर्दिला वेगळं वळण मिळालं.

9 / 12

रॉबिन सिंगला भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. पण, त्यानं जिद्द सोडली नाही. 1989मध्ये त्यानं भारतीय संघाकडून पदार्पण केलं आणि भारतीय संघाकडून खेळणारा तो पहिला परदेशी खेळाडू ठरला. 2001 मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

10 / 12

2004मध्ये त्यानं भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. 2006मध्ये त्याची हाँगकाँग क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली. त्याच वर्षी हाँगकाँग आशिया चषक स्पर्धेसाठी क्वालिफाइड झाला. भारत अ संघाचा कोच असताना गौतम गंभीर व रॉबिन उथप्पा यांनी त्याच्या मार्गदर्शनाखाली सराव केला.

11 / 12

2007मध्ये तो भारतीय संघाचा फिल्डींग कोच होता, 2008मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबाद संघानं त्याची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. सध्या तो मुंबई इंडियन्स संघाचा फिल्डींग कोच आहे.

12 / 12

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघवेस्ट इंडिज