Join us
Daily Top 2Weekly Top 5

कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:40 IST

Open in App
1 / 6

Henry Olonga : क्रिकेटमध्ये काही खेळाडू त्यांच्या विक्रमांमुळे लक्षात राहतात, तर काही खेळाडू त्यांच्या खासगी आयुष्यातील प्रेरणादायी, अस्वस्थ करणाऱ्या कहाणीमुळे इतिहासात कोरले जातात. झिम्बाब्वेचा माजी वेगवान गोलंदाज Henry Olonga हा अशाच दुर्मिळ क्रिकेटपटूंमधील एक आहे. कधीकाळी आपल्या वेगवान बाउन्सरने Sachin Tendulkar ला अडचणीत टाकणारा ओलोंगा, आज ऑस्ट्रेलियात छोट्या बारमध्ये, शाळांमध्ये आणि क्रूझ शिपवर गाणी गाऊन आपली उपजीविका करत आहे.

2 / 6

ओलोंगाला संगीताची आवड क्रिकेट कारकिर्दीत असतानाच होती. मैदानावर वेगवान चेंडू टाकतानाच तो गाणी लिहीत आणि सादरही करत असे. 2001 मध्ये त्याने “Our Zimbabwe” हे गाणे प्रकाशित केले. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष Robert Mugabe यांच्या काळातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हे गाणे झिम्बाब्वेच्या वेदना आणि आशा यांचे प्रभावी प्रतीक ठरले.

3 / 6

2003 च्या Cricket World Cup 2003 दरम्यान ओलोंगा आणि त्याचा सहकारी Andy Flower यांनी मैदानात काळी फित बांधून उतरायचा धाडसी निर्णय घेतला. झिम्बाब्वेमधील लोकशाहीची अवस्था दर्शवण्यासाठी केलेले हे शांत आंदोलन होते. पण या धाडसाची किंमत फार मोठी होती. ओलोंगाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या, संघाच्या बसमधून काढून टाकण्यात आले आणि अखेर त्याला देश सोडावा लागला. पुढे तो ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला.

4 / 6

ऑस्ट्रेलियातील सुरुवातीची वर्षे कठीण होती. विविध छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्यानंतर गेल्या दशकभरात ओलोंगाने गायक म्हणून ओळख मिळवली. आज तो शाळा, बार, आणि क्रूझ शिपवर छोटे-मोठ्या कार्यक्रमात गाणे गातो. अनेकदा अगदी मोजक्या प्रेक्षकांसमोरही. झगमगाट नसला तरी हेच त्याचे वास्तव आहे आणि ते तो मनापासून स्वीकारतो. 2019 मध्ये त्याने The Voice मध्येही सहभाग घेतला होता. पण यशाची झगमगती दुनिया त्याच्या वाट्याला आली नाही.

5 / 6

ओलोंगाच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी पैलू म्हणजे, तो गेली 20 वर्षे आपल्या मायदेशी परतलेला नाही. बुलावायोमध्ये राहणारे त्याचे वडील आता 80 च्या पुढे आहेत, पण त्यांची भेट घेण्याचे स्वप्न आजही अपूर्ण आहे. आज ओलोंगा आपल्या यूट्यूब चॅनेलवर गाणी रिलीज करतो. आपल्या आयुष्याबद्दल ओलोंगा म्हणतो, माझे आयुष्य काहींना कंटाळवाणे वाटेल, पण ते प्रामाणिक आहे. आणि मी कोणत्याही अडचणीत नाही, एवढे पुरेसे आहे.

6 / 6

भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात ओलोंगा एका खास क्षणासाठी कायम लक्षात राहील. 1998 च्या Champions Trophy 1998 (तेव्हाच्या कोका-कोला कप) दरम्यान त्याने सचिन तेंडुलकरला एका वेगवान बाउन्सरवर बाद केले होते. हा क्षण इतका परिणामकारक होता की, समालोचक अजय जडेजा यांनी नंतर सांगितले होते की, “त्या सामन्यानंतर पुढच्या मॅचपर्यंत सचिनला नीट झोपही लागली नव्हती.”

टॅग्स :ऑफ द फिल्डसचिन तेंडुलकरझिम्बाब्वे