मी ४ वर्षांनंतर आता माझ्या नातीला भेटेन; पाकिस्तानी खेळाडूच्या भारतीय सासऱ्यानं व्यक्त केली इच्छा

IND vs PAK World Cup 2023 : पाकिस्तानी खेळाडू विश्वचषकाच्या निमित्ताने आपल्या सासुरवाडीत अर्थात भारतात आला आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीला वन डे विश्वचषक २०२३ साठी पाकिस्तानी संघात स्थान मिळाले आहे. खरं तर हरयाणातील नूह जिल्ह्याचे निवृत्त अधिकारी लियाकत खान यांच्या मुलीशी हसन अलीने विवाह केला आहे.

पाकिस्तानी खेळाडू विश्वचषकाच्या निमित्ताने आपल्या सासुरवाडीत अर्थात भारतात आला आहे. १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत.

लियाकत खान यांची मुलगी सामिया हिचा विवाह पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीशी २०१९ मध्ये झाला होता. मात्र, लग्नाला ४ वर्षे झाली तरी ते आपल्या लेकीच्या घरी पाकिस्तानला जाऊ शकले नाहीत.

लियाकत खान यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, माझी पत्नी २०२१ मध्ये पाकिस्तानला गेली जेव्हा माझी मुलगी पहिल्या पाल्याला जन्म देणार होती. त्यामुळे आता माझी नात अहमदाबादमध्ये भेटेल अशी आशा आहे.

६३ वर्षीय लियाकत खान म्हणतात की, मला माझ्या नातीला माझ्या मांडीवर खेळवण्याची खूप इच्छा आहे. हसन अली आणि सोमिया यांना एक मुलगी आहे.

मुलीने पाकिस्तानी खेळाडूशी लग्न केले याबद्दल लियाकत खान यांनी म्हटले, "मी माझे निर्णय तिच्यावर लादले तर शिक्षणाचा काय फायदा? ती हुशार, सुशिक्षित आणि स्वतंत्र आहे. लोक आपल्या पाठीमागे वाईट बोलतात याची आपल्याला कल्पना आहे. फाळणीच्या वेळी तिथे स्थलांतरित झालेली कुटुंबे पाकिस्तानात आहेत. त्यामुळे तिच्या निर्णयाचा आम्हाला अभिमान आहे."

तसेच क्रिकेट विश्वात विराट कोहलीपेक्षा मोठा खेळाडू कोणताही नसल्याचे लियाकत खान यांनी नमूद केले.

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी. राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.