हार्दिक पांड्याची Fastest Fifty अन् बरेच विक्रम!

क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा हे सलामीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर हार्दिक पांड्याच्या वादळी खेळीनं मुंबई इंडियन्सच्या चमूत विजयाची वातावरण निर्मीती केली होती. पण, कोलकाता नाइट रायडर्सने 34 धावांनी सामना जिंकून हार्दिकची झुंज अपयशी ठरवली.

या सामन्यात हार्दिकने 34 चेंडूंत 91 धावा चोपल्या. हार्दिकने 14 व्या षटकात सुनील नरीनच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. त्याने 2019च्या आयपीएलमधील सर्वात जलद ( 17 चेंडू ) अर्धशतकाचा विक्रम नावावर केला. त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतचा ( 18 चेंडू) मुंबई इंडियन्सविरुद्धचा विक्रम मोडला.

सहाव्या क्रमांकावरील ही आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी ठरली. हार्दिकने कोलकाताविरुद्ध सहाव्या क्रमांकावर येत 91 धावांची खेळी केली. त्याने 2018 साली आंद्रे रसेलने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध नोंदवलेला नाबाद 88 धावांचा विक्रम मोडला. या क्रमवारीत महेंद्रसिंग धोनी ( 88* वि. RCB, 2019) आणि ख्रिस मॉरिस ( 82* वि. गुजरात लायन्स, 2016) यांचा क्रमांक येतो.

आयपीएलमध्ये कमी चेंडूंत 90+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये हार्दिकने आघाडी घेतली. त्याने 267.64 च्या स्ट्राइक रेटने 34 चेंडूंत 91 धावा चोपल्या. यासह त्याने 2014 साली किंग्स इलेव्हन पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेलचा 38 चेंडूंत 90 धावांचा ( 236.84 स्ट्राइक रेट) विक्रम मोडला.

30+ चेंडूंचा सामना करून सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेल्या फलंदाजांमध्ये हार्दिकने तिसरे स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत युसूफ पठाण ( 37 चेंडूंत 100 धावा, 2010) 270.27चा स्ट्राइक रेटसह आघाडीवर आहे. किरॉन पोलार्डने ( 267.74 स्ट्राइक रेट) 2019मध्ये 31 चेंडूंत 83 धावा केल्या होत्या. त्यानंतर हार्दिकने 267.64 च्या स्ट्राइक रेटने खेळी केली.

आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतकाच्या विक्रमात हार्दिकने किरॉन पोलार्ड व इशान किशन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. या तिघांनीही 17 चेंडूंत अर्धशतक झळकावले.

या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सच्या पीयूष चावलाने आयपीएलमध्ये 150 विकेट घेण्याचा पराक्रम नावावर केला. आयपीएलमध्ये 150 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. या विक्रमात लसिथ मलिंगा ( 166) आणि अमित मिश्रा ( 152) आघाडीवर आहेत.

मुंबई इंडियन्सवर 34 धावांनी मात करून कोलकाता नाइट रायडर्सने विजयाचे शतक साजरे केले.