इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वापूर्वी ( IPL 2022) दुखापतग्रस्त भारतीय खेळाडूंना फिटनेस टेस्टसाठी NCA मध्ये दाखल होण्यास सांगितले होते. त्यानुसार लोकेश राहुल, शिखर धवन, दीपक चहर, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव हे बंगळुरूत दाखल झाले. पण, हार्दिकने अहमदाबाद येथेच राहणे पसंत केले होते.
मात्र, निवड समितीने दम भरला आणि हार्दिकला यू टर्न घ्यावा लागला. आता हार्दिक फिटनेस कॅम्पसाठी NCA मध्ये दाखल होण्यास तयार झाला. हार्दिक NCA कॅम्पला सतत दांडी मारत होता आणि त्यावरून निवड समिती नाराज होती.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाच्या शर्यतीत अजूनही हार्दिक आहे. पण, त्याने मुंबई व अहमदाबाद येथेच तंदुरुस्तीवर काम करण्याचा निर्णय घेतला होता. पण, निवड समिती अध्यक्षांचा एक फोन गेला अन् हार्दिकनं निर्णय बदलला.
BCCIने मागील आठवड्यात इशान किशन, भुवनेश्वर कुमार व वेंकटेश अय्यर यांच्यासह २५ खेळाडूंना NCA कॅम्पमध्ये दाखल होण्यास सांगितले होते. NCA अध्यक्ष व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्या देखरेखीखाली १० दिवसांचा हा कॅम्प भरवला गेला आहे.
PTI ने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिक पांड्या जोपर्यंत तंदुरूस्ती चाचणीत उतीर्ण ठरत नाही, तोपर्यंत त्याला आयपीएल २०२२ खेळण्याची परवानगी देणार नसल्याची भूमिका बीसीसीआयने घेतली आहे.
BCCI चे अधिकारी म्हणाले,''त्याला तंदुरूस्ती चाचणीत पास व्हावे लागेल आणि ते अनिवार्य केले गेले आहे. मागील वर्षी श्रेयस अय्यरलाही आयपीएलपूर्वी ही चाचणी द्यावी लागली होती. त्याच्या दुखापतीमुळे त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली होती.''
हार्दिकने गुजरात टायटन्सच्या बडोदा येथे झालेल्या पाच दिवसांच्या सराव शिबिरात गोलंदाजी केल्याचे वृत्त तेथील स्थानिक मीडियाने दिले होते. पण, त्याची फलंदाजी व क्षेत्ररक्षणातील कामगिरी यावरून त्याची तंदुरूस्ती ठरवली जाईल.ही टेस्ट सोपी नक्की नसेल. १० ओव्हर्स फेक अन् फिटनेस सिद्ध कर आणि मग आयपीएल खेळ असा पवित्रा बीसीसीआयन व एनसीएने घेतला आहे.
''NCAचे फिजिओ व व्ही व्ही एस लक्ष्मण हे फिटनेस टेस्ट प्रोग्राम तयार करतील. पण, निवड समितीने हे स्पष्ट केले आहे की त्याला किमान १० षटकं फेकावी लागतील आणि Yo-Yo टेस्ट पास करावी लागेल. त्याला विशेष सवलत दिली जाणार नाही. त्यामुळे हार्दिकला Yo-Yo टेस्टमध्ये १६.५ पेक्षा अधिक गुण मिळवावे लागतील,''असे बीसीसीआयने स्पष्ट केले.
हार्दिक पांड्याने याआधी Yo Yo टेस्टमध्ये १८ पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत, त्यामुळे तो यंदाही पास होईल.