भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनं नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आपल्या निवृत्तीनंतर हरभजननं भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर काही आरोप केले होते. आपल्याला कोणतंही कारण न सांगता टीममधून बाहेरचा रस्ता का दाखवण्यात आला यावर त्यानं भाष्य केलं होतं.
आता हरभजन सिंगनं भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या (BCCI) काही अधिकाऱ्यांवर आरोप केले आहे. आपलं संघात पुनरागमन होऊ नये असं त्यावेळी काही अधिकाऱ्यांना वाटत होतं, असं हरभजन म्हणाला.
त्यावेळी धोनी कर्णधार होता आणि त्यानंदेखील अधिकाऱ्यांना सपोर्ट केला. जर माझी कधी बायोपिक किंवा वेब सीरिज (Web Series) तयार झाली, तर त्यात एक नाही, अनेक व्हिलन असतील, असंही त्यानं सांगितलं.
'काही बाहेरील लोक होते जे माझ्या बाजूनं नव्हते. ते पूर्णपणे माझ्या विरोधातही होते असंही म्हणता येईल. मी ज्या प्रकारे गोलंदाजी करत होतो आणि पुढे जात होतो, हे त्याचं कारण आहे. मी ३१ वर्षांचा होतो तोवर मी ४०० विकेट्स घेतल्या होत्या आणि अजून ४-५ वर्षे खेळण्याचा विचारही होता. परंतु तसं झालं असतं तर मी अजून १००-१५० विकेट्स घेऊ शकलो असतो,' असंही तो म्हणाला.
मला कर्णधारपद भूषवता येत नव्हतं किंवा मी त्याच्या लायक नव्हतो. बीसीसीआयमध्ये वरिष्ठ पदावर असेल आणि कर्णधारपदासाठी माझ्या नावाची शिफारस करेल अशी माझ्याकडे पंजाबमधील कोणतीही व्यक्ती नव्हती. जर ते असतं तर मला कर्णधारपद मिळालं असतं, असं हरभजननं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. त्यानं झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं.
'तेव्हा धोनी कर्णधार होता आणि सर्व गोष्टी त्याच्या डोक्यावरून गेल्या असतील असं मला वाटतं. मी पुढे खेळू नये असं काही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनाही वाटायचं आणि त्यावेळी कर्णधारानंही त्यांना सपोर्ट केलं. परंतु कर्णधार, कोच किंवा टीम कधीही बीसीसीआयपेक्षा मोठे नसतात,' असं त्यानं सांगितलं.
अन्य प्लेयर्सच्या तुलनेत धोनीला अधिक आणि चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळाला. जर असा पाठिंबा अन्य खेळाडूला मिळाला असता तर त्यानंही चांगली कामगिरी करून दाखवली असती असंही त्यानं नमूद केलं.
कोणताही खेळाडू बॉल स्विंग करणं विसरला किंवा बॅटिंग विसला असं नव्हतं. प्रत्येक खेळाडूची ही इच्छा असते की संघाची जर्सी घालूनच आपण निवृत्ती घ्यावी. परंतु सर्वांसोबत तसं होत नाही. व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, सेहवाग यांना एक उदाहरण म्हणून पाहू शकता असंही तो म्हणाला.
माझ्या करिअरवर एक बायोपिक किंवा एक वेब सीरिज तयार व्हावी असं वाटतं. माझीही बाजू लोकांना पाहता येईल. मी माझ्या कारकिर्दीत काय केलं आणि लोकांनी माझ्यासोबत काय केलं हे सर्वांसमोर येईल. यात व्हिलन कोण असेल हे मी सागू शकत नाही. परंतु यात एक नाही, तर अनेक व्हिलन असतील, असंही हरभजन म्हणाला.