भारताचा जावई लैय भारी! ग्लेन मॅक्सवेलची तुफान फटकेबाजी, ऑस्ट्रेलियाची ८ मोठ्या विक्रमांची आतषबाजी

ICC ODI World Cup AUS vs NED Live : भारतीय वंशाच्या मुलीसोबत लग्न करून भारताचा जावई झालेल्या ग्लेन मॅक्सवेलने आज दिल्ली गाजवली. मॅक्सवेलचे वादळ घोंगावले. त्याने ४४ चेंडूंत १०६ धावा चोपल्या. त्यात ९ चौकार व ८ षटकारासह ८४ धावा ८४ चेंडूंतच त्याने चोपल्या. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ८ बाद ३९९ धावा केल्या.

डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ ( ७१) या अनुभवी जोडीने ११८ चेंडूंत १३२ धावांची भागीदारी केली. मार्नस लाबुशेनने ( ६२) वॉर्नरसोबत ८४ धावा जोडल्या. वॉर्नरने वर्ल्ड कप स्पर्धेतील सहावे शतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. वॉर्नर ९३ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह १०४ धावांवर झेलबाद झाला.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये ग्लेन मॅक्सवेल चौथ्या क्रमांकावर आला आहे. ख्रिस गेलने सर्वाधिक ४९ षटकार खेचले आहेत. त्यापाठोपाठ रोहित शर्मा ( ४०), एबी डिव्हिलियर्स ( ३७), ग्लेन मॅक्सवेल ( ३१*) आणि रिकी पाँटिंग ( ३१) असा क्रम येतो.

वन डे क्रिकेटमध्ये ४१-५० या शेवटच्या १० षटकांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ग्लेन मॅक्सवेल १०६ ( ४४ चेंडू) पाचव्या क्रमांकावर आला आहे. एबी डिव्हिलियर्स ( १२१ धावा, ३६ चेंडू वि. वेस्ट इंडिज २०१५), रोहित शर्मा ( ११० धावा, ४४ चेंडू वि. श्रीलंका २०१४), एबी ( १०९* धावा ३५ चेंडू वि. वेस्ट इंडिज २०१५) आणि रोहित ( १०७* धावा ३७ चेंडू वि. श्रीलंका २०१७) हे आघाडीवर आहेत.

ग्लेन मॅक्सवेल व पॅट कमिन्स यांनी आज ७व्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली, जी वर्ल्ड कप स्पर्धेतील या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ठरली. यापूर्वी २०१९मध्ये कोल्टर नाईल व स्टीव्ह स्मिथ यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध १०२ धावा जोडल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्ड कप स्पर्धेतील एका इनिंग्समध्ये सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत मॅक्सवेलने रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट ( ८) यांच्याशी बरोबरी केली. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पाकिस्तानविरुद्ध ( २०२३) बंगळुरूत सर्वाधिक ९ षटकार ठोकले होते.

ऑस्ट्रेलियाकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या बाबतील ग्लेन मॅक्सवेल १३१ सिक्ससह तिसरा आहे. त्याने आज शेन वॉटसन ( १३१) व आरोन फिंच ( १२९) यांना मागे टाकले. या विक्रमात रिकी पाँटिंग ( १५९) व गिलख्रिस्ट ( १४८) पुढे आहेत.

८ बाद ३९९ धावा हा ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील नेदरलँड्सविरुद्धचा सर्वोत्तम खेळ ठरला. २००७मध्ये त्यांनी ५ बाद ३५८ धावा केल्या होत्या. २०१५ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ६ बाद ४१७ धावांची धावसंख्या उभी केली होती. त्यानंतर आजच्या खेळीचा नंबर येतो.

वन डे क्रिकेटमध्ये शेवटच्या १० षटकांत सर्वाधिक २ वेळा १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये मॅक्सवेलने एन्ट्री घेतली. रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, जोस बटलर यांनी प्रत्येकी २ वेळा ही कमाल केलीय.