Join us  

गौतम गंभीर तर आहेच... पण, कोलकाता नाईट रायडर्सच्या चॅम्पियन बनण्याच्या प्रवासातील हेही शिलेदार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 12:24 PM

Open in App
1 / 7

गौतम गंभीरला पर्वाच्या सुरुवातीला मेंटॉरपदी निवडणे, हा शाहरुख खान अन् त्याच्या टीमचा मास्टरस्ट्रोक ठरला. हाच गंभीर जेव्हा लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता, तेव्हा संघाने दोनवेळा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे गंभीरची निवड ही कालच्या विजयाने KKR साठी सार्थ ठरली... पण, या विजयाचे श्रेय एकट्या गंभीरचे नसून त्यात आणखीनही शिलेदार आहेत...

2 / 7

गौतम गंभीरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे आणि आपल्याकडे असलेल्या खेळाडूंना कसा व कधी योग्य वापर करून घ्यायचा याचा अभ्यासही त्याने केलेला असतो. त्यामुळे अंगक्रिश रघुवंशी ( १६३ धावा), रमणदीप सिंग ( १२५), रिंकू सिंग ( १६८), हर्षित राणा ( १९ विकेट्स) व वैभव अरोरा ( १७ विकेट्स) या युवा खेळाडूंना त्याने योग्य संधी देऊन त्यांच्या कौशल्याला वाव दिला.

3 / 7

सुनील नरीनला सलामीला संधी देणे हा गौतमचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक ठरला... २०१२चा प्लेअर ऑफ दी मॅच नरीन गौतमच्या नेतृत्वाखाली चमकला होता. त्यामुळे त्याची ताकद त्याला माहीत होती आणि इतकी वर्ष KKR ने त्याचं कौशल्य वाया घालवलं.

4 / 7

ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये आक्रमक सुरुवात महत्त्वाची आहे आणि त्यासाठी सुनील नरीन हा उत्तम पर्याय KKR कडे होता. त्याने या पर्वात फिल सॉल्टसह प्रतिस्पर्धींचे धाबे दणाणून सोडले. १५ सामन्यांत त्याने १८०.७४च्या स्ट्राईक रेटने ४८८ धावा चोपल्या. शिवाय त्याने गोलंदाजीत १७ विकेट्सही घेतल्या. १२ धावांनी त्याला मोठा विक्रम करता आला नाही. आयपीएलच्या एकापर्वात ५०० हून अधिक धावा आणि १५ हून अधिक विकेट्स घेणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान त्याला पटकावता आला असता.

5 / 7

फिल सॉल्ट याला विसरून चालणार नाही... नरीनसह त्याने KKR ला स्फोटक सुरूवात करून दिली. त्याने १२ सामन्यांत ४ अर्धशतकांसह १८२च्या स्ट्राईक रेटने ४३५ धावा केल्या. वेंकटेश अय्यर ( ३७०), कर्णधार श्रेयस अय्यर ( ३५१), आंद्रे रसेल ( २२२) यांनी मधल्या फळीत दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. आंद्रे रसेलने १९ विकेट्सही घेऊन त्याचे अष्टपैलू कौशल्य सिद्ध केले.

6 / 7

मिचेल स्टार्कसाठी KKR ने २४ कोटींहून अधिक रक्कम मोजली. स्टार्कला सुरुवातीच्या सामन्यांत प्रभाव पाडता आला नाही, परंतु महत्त्वाच्या सामन्यात अनुभवच कामी येतो, हे त्याने दाखवून दिले. त्याच्या नावावर १४ सामन्यांत १७ विकेट्स आहेत.

7 / 7

चंद्रकांत पंडित यांना विसरून कसे चालेल.... मुंबई, विदर्भ, मध्य प्रदेश अशा संघांनी त्यांच्या मार्गदर्शनात रणजी करंडक उंचावला आणि त्यांचे प्रशिक्षण हे युवा खेळाडूंसाठी महत्त्वाचे ठरले आहे.

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सगौतम गंभीर